एसटी कामगार आंदोलन भाजपनं तेवत ठेवलं, नाना पटोलेंचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एसटी कामगारांचे आंदोलन संपले असून 80 टक्के कामगार कामावर परतले आहेत. मात्र असे असले तरी आंदलनाच्या शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ल्याने राज्यात राजकारण तापले. कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर कामगारांना चिथावल्याचा आरोप आहे, त्यांची चौकशी सुरू आहे, असे असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आंदोलन तेवत ठेवण्यात भाजपचा हात असल्याचा आरोप केला आहे. टीव्ही9 वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हा आरोप केला.

‘गेल्या पाच महिन्यात महाराष्ट्राचं, मराष्ट्राच्या जनतेचं, एसटी कामगारांचं नुकसान झालं. त्यांचे पगार कमी, कुटुंबाची वाईट परिस्थिती झाली. पाच महिने भाजपने या आंदोलनाला तेवत ठेवणं, जनतेला त्रास देणं हे भयानक आहे. असं कृत्य महाराष्ट्रात घडू नये’, असेही नाना पटोले म्हणाले.

अपयश लपवण्यासाठी केंद्राकडून धार्मिक विद्ध्वंस!

‘केंद्रातील भाजप सरकार गेल्या आठ वर्षात सपशेल फेल ठरलं आहे. महागाई, बेरोजगारी हे प्रश्न मोठ्या प्रमाणात वाढले असून केंद्र सरकार हे रोखण्यात अयशस्वी ठरली. आपली खूर्ची वाचवण्यासाठी धार्मिक विद्ध्वंस निर्माण करणं हा त्यातला पर्याय होता’, असा आरोप त्यांनी केला.

बदल्या या नेहमीच्याच!

बदल्या या नेहमीच्याच आहेत. बदल्यांची प्रक्रिया ही काही ठरवून केली जात नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.