नगरमधील बहुचर्चित उड्डाणपूल दिवाळीदरम्यान पूर्ण होणार, प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर शहरातील चर्चेत असलेला उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर हे काम युद्धपातळीवर सुरु आहे. दिवाळीपर्यंत या उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आला असून, त्या दृष्टिकोनातून आता प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झालेल्या आहेत.

नगर शहराच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा असलेला उड्डाणपूल हा गेल्या अनेक वर्षापासूनचा विषय रेंगाळलेला होता. दहा वर्षांपासून उड्डाणपूल होणार की नाही याबाबत तर्क-वितर्क मांडले जात होते. उड्डाणपूल व्हावा याकरीता शिवसेना उपनेते दिवंगत अनिल राठोड यांनी उड्डाणपूल व्हावा याकरता आंदोलनही केले होते. त्यानंतर अनेक वेळेला उड्डाणपूल होण्यासाठी बैठकाही झाल्या. प्रशासकीय पातळीवर सुरूवातीला हा उड्डाणपूल करण्यासाठी नगर-पुणे महामार्गावरील हा उड्डाणपूल करावा असे सुचवण्यात आले होते. त्यावेळी त्याची किंमत 18 कोटी रुपये होती, पण दहा वर्षानंतर हा विषय रेंगाळलेला विषय भिजत घोंगडया प्रमाणे राहिल्याने आता या उड्डाणपुलाची लांबी वाढण्यात आली.

आता हा उड्डाणपूल 256 कोटी रुपयांच्या घरामध्ये गेलेला आहे. त्यावेळेला उड्डाण पुलाचे श्रेय घेण्यासाठी दोन वेळा या उड्डाणपुलाचे भूमिपूजन करण्यात आले होते. तत्कालिन खासदार दिलीप गांधी यांनी त्यांनी त्याचे भूमिपुजन करून घेतले होते. या अगोदर माजी पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनीसुद्धा भूमिपुजन केले होते. मात्र, प्रत्यक्षात कोणते ही काम सुरू झालेले नव्हते.

लष्करच्या हद्दीतील जागा मिळत नाही, तोपर्यंत उड्डाणपूलाचे काम सुरू होणार नव्हते. त्यासाठी खासदार सुजय विखे यांनी प्रशासकीय पातळीवर अनेक बैठका घेतल्या. गेल्या दहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या उड्डाणपुलाच्या लष्कराच्या जागेला परवानगी मिळाल्यानंतर प्रत्यक्षात या कामाला सुरुवात करण्यात आली.

नगर शहरात हा सक्कर चौकापासून या उड्डाणपुलाला प्रत्यक्षात सुरूवात होणार आहे. पुढे अशोका हॉटेल म्हणजेच जुने टेलिफोन भवनपर्यंत हा पूल उभारण्यात येणार आहे. या पुलाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. विशेष म्हणजे 256 कोटी रुपयांचा हा पूल आता होणार आहे. या पुलाकरता 84 खांब उभारण्यात आलेले आहेत. पुलाकरता दोन ठिकाणी दुचाकी वाहने उतरण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे. या पुलाचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू झालेले असून, ते आता प्रगतीपथावर आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून या कामावर देखरेख केली जात आहे. पुलाखालचा रस्तादेखील डांबरी करुन खुला करण्यात आला आहे.

त्यामुळे हे काम गेल्या वर्षभरापासून अतिशय प्रगतीपथावर सुरू आहे. लवकरच हे काम पूर्णत्वाला जाणार आहे. साधारणतः दिवाळीच्या दरम्यान हा पूल पूर्ण व्हावा असा उद्देश असूद, त्यादृष्टीने प्रशासनाने तयारी केली आहे.