
अवैधरित्या सावकारी करीत महिन्याला तब्बल 10 टक्के दराने व्याजवसुली करणाऱ्या कपडे विक्रेत्या सावकाराला गुन्हे शाखेच्या युनिट दोनने अटक केली. त्याच्याकडून कर्जदारांच्या सहीचे धनादेश, कोरे स्टॅम्पपेपर जप्त करण्यात आले आहेत. त्याच्याविरूद्ध महाराष्ट्र सावकारी प्रतिबंधक कायद्यानुसार दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरत बाबू लालजी उणेचा (वय 36, रा.अपर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पुणे शहरातील अवैध सावकारी मोडीत काढण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशाने संबंधितांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांना तब्बल 10 टक्के व्याज दराने कर्ज देऊन त्यांच्याकडून अवैधरित्या वसुली करणाऱ्या सावकाराची माहिती युनिट दोनला मिळाली होती.
त्यानुसार पथकाने सापळा रचून कपडे विक्रीचा व्यवसाय करीत सावकारी करणाऱ्या भरत उणेचा याला ताब्यात घेतले. कर्जदाराकडून मुद्दल व्याजासहित वसूल करण्यात आली असून तो कर्जदाराला जीवे मारण्याची धमकी देत असल्याचेही उघडकीस आले आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी गजानन टोम्पे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, उपनिरीक्षक संजय गायकवाड, उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे, मोहसिन शेख, संजय जाधव, साधना ताम्हाणे, उत्तम तारु, निखिल जाधव, मितेश चोरमोले, नागनाथ राख यांनी केली.
अवैधरित्या सावकारी करणाऱ्याला अटक केली आहे. यासंदर्भात अशाप्रकारे अवैध सावकारीच्या तक्रारी असलेल्या नागरिकांनी गुन्हे शाखा युनिट दोन कार्यालयाला माहिती द्यावी.
– क्रांतीकुमार पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, युनिट दोन


























































