
स्विमिंग पूलमध्ये पडून चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना गोरेगाव परिसरात घडली. माहीर चिराग शहा असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
माहीर हा दिंडोशी येथील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहत होता. गेल्या आठवडय़ात माहीर हा त्याच्या आईसोबत इमारतीमधील स्विमिंग पूलमध्ये आला होता. स्विमिंग झाल्यावर त्याची आई ट्रेनरसोबत चर्चा करत होती. तेव्हा माहीर हा पुलाच्या कठडय़ावरून चालत येत होता. त्याचा तोल गेल्याने तो पाण्यात पडला. काही वेळाने माहीरच्या आईने त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा माहीर हा स्विमिंग पूलमध्ये पडलेला दिसला. त्याला तत्काळ गोरेगाव येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती समजताच दिंडोशी पोलीस घटनास्थळी गेले. पोलिसांनी माहीरच्या एका नातेवाईकाचा जबाब घेतला आहे. या गुह्याचा तपास उपनिरीक्षक प्रवीण कांबळे करत आहेत.


























































