
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर बुधवारी उमरान मलिक नावाचे वादळ तुफानी वेगाने घोंगावले. उमरानने आपल्या तुफानी गोलंदाजीने गुजरात टायटन्सच्या 5 फलंदाजांना तंबूत परतवले. गुजरातचा यष्टिरक्षक-फलंदाज रिद्धिमान सहाला उमरानने टाकलेला यॉर्कर चेंडू चक्क ताशी 153 किमी इतक्या भन्नाट वेगाचा होता. हा चेंडू कळायच्या आतच सहाच्या यष्टय़ा उद्ध्वस्त झाल्या होत्या. रशीद खानच्या झुंजार फलंदाजीमुळे गुजरातने ही चुरशीची लढत जिंकली खरी, पण मुंबईकर क्रिकेटशौकिनांची मने मात्र जम्मू-कश्मीरचा ‘तुफानवीर’ उमरान मलिकने जिंकली. त्याने गुजरातच्या 4 फलंदाजांना त्रिफळाचित केले.
कश्मीरचा हा युवा ‘तुफानवीर’ बुधवारी सरासरी ताशी 145 किमी या वेगाने गोलंदाजी करीत होता. 25 धावांत 5 विकेट घेणाऱया उमरानला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार देण्यात आला.
n शुभमन गिल (चेंडूचा वेग ताशी 144 किमी)
उमरानने 40 व्या आयपीएल लढतीत आपली पहिली विकेट शुभमन गिलच्या रूपात मिळवली. त्याच्या ताशी 144 किमी वेगाच्या चेंडूने गिलचा उजवा स्टंप उडाला. आऊट होताना शुभमनने फक्त 22 धावा नोंदवल्या.
n हार्दिक पांडय़ा (चेंडूचा वेग ताशी 143 किमी)
उमरानने दुसरी विकेट गुजरातचा कर्णधार हार्दिक पांडय़ाला बाद करून मिळवली. दहाव्या षटकात उमरानने ताशी 144 किमी या वेगाने टाकलेल्या वेगवान बाऊन्सरवर पूल करताना पांडय़ा थर्ड मॅनवर झेल देऊन परतला.
n रिद्धिमान सहा (चेंडूचा वेग ताशी 153 किमी)
उमरानने तिसरी विकेट उत्तम फलंदाजी करणाऱया रिद्धिमान सहा याची घेतली. सहाला उमरानने चक्क ताशी 153 किमी इतक्या बंदुकीच्या गोळीच्या वेगाचा यॉर्कर टाकला. हा चेंडू कळायच्या आतच सहाच्या यष्टय़ा उडवून गेला.
n डेव्हिड मिलर (चेंडूचा वेग ताशी 148 किमी)
गुजरातचा स्टार फलंदाज डेव्हिड मिलर यालाही उमरानने आपल्या भन्नाट वेगाच्या चेंडूने चकवले. तुफानी वेगाच्या चेंडूने उमरानने मिलरचे स्टम्प पार उद्ध्वस्त केले. आपल्या शिष्याच्या या पराक्रमामुळे हैदराबादचा गोलंदाजी प्रशिक्षक डेल स्टेन मात्र प्रचंड खुश झालेला दिसला.
n अभिनव मनोहर (चेंडूचा वेग ताशी 146 किमी)
उमरानने अभिनव मनोहरला टाकलेला चेंडू ताशी 146 किमी या वेगाचा होता. क्रॉस सिम झालेला हा वेगवान चेंडू कळायच्या आतच मनोहरच्या यष्टय़ा उद्ध्वस्त झाल्या होत्या.
























































