
कोरोनामुळे विद्यापीठांच्या तीन सत्र परीक्षा ऑनलाइन झाल्या. आता कोरोना कमी झाल्याने आगामी सत्र परीक्षा ऑफलाइन घेण्याचा निर्णय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने घेतला. मात्र, ही परीक्षादेखील ऑनलाइनच घ्यावी, अशी मागणी होत आहे. 25 मेपासून परीक्षा घेण्याचे नियोजन असून, परीक्षा ऑफलाइनच होईल, अशी ठाम भूमिका विद्यापीठाने घेतली आहे. कुलगुरूंच्या बैठकीनंतर वेळापत्रक अंतिम होणार आहे.
कोरोनाच्या तिन्ही लाटांमध्ये विद्यापीठांनी विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाइनच घेतल्या. आता विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी ऑफलाइनच परीक्षा घेण्यावर विद्यापीठ प्रशासन ठाम आहे. काही विद्यार्थी संघटनांनी परीक्षा ऑनलाइन घ्यावी, अशी मागणी केली, तर काहींनी वेळ वाढवून देण्याची विनंती केली आहे. त्यासंदर्भात कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या बैठक घेणार आहेत. दरम्यान, परीक्षेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया महाविद्यालयांच्या स्तरावर होणार आहे.

























































