
पूर्ववैमनस्यासह आर्थिक देवाण घेवाणीच्या वादातून तरूणावर गावठी कट्टयातून गोळीबार करून खून प्रकरणामधील मुख्य आरोपी आणि मोक्का गुन्हयातील तीन वर्षांपासून फरारीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. ही घटना मे 2019 मध्ये सासवडमधील कोंडीत गावात घडली होती.
गोविंद गजेंद्र वाघमारे (वय 31, रा. जांब, ता. परंडा, धाराशिव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. हसन शेख (रा. धायरीगाव) असे खून झालेल्याचे नाव आहे. कोंडीत गावच्या हद्दीत मे 2019 मध्ये पूर्ववैमनस्य व आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून आरोपी मंगेश कदम (रा. कोल्हेवाडी, ता. हवेली) याच्यासह इतर 14 ते 15 साथीदारांनी हसन शेख यांचा खून केला होता.
त्यावेळेस संबंधित गुन्ह्यातील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा आणि सासवड पोलिसांनी अटक केली होती. मात्र, गुन्ह्यातील मुख्य आरोपी मंगेश कदम आणि साथीदार गोविद वाघमारे हे गुन्हा केल्यापासून फरार होते. पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी दोघेही जागा बदलून राहत होते. दरम्यान, संबंधित घटना गंभीर स्वरुपाची असल्यामुळे आरोपींविरूद्ध मोक्का कारवाई करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक 26 एप्रिलला हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत फरारी आरोपीचा शोध घेत होते. त्यावेळी मुख्य आरोपी कोल्हेवाडीत येणार असल्याची माहिती पोलीस नाईक अमोल शेडगे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून गोविंद वाघमारे याला ताब्यात घेतले. ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके, उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, अमोल शेडगे, बाळासाहेब खडके, धिरज जाधव, पूनम गुंड यांनी केली.


























































