हिरो इलेक्ट्रिकचे झिरो डिस्पॅच; एप्रिलमध्ये कंपनीला बसला मोठा फटका, दिले हे कारण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इलेक्ट्रिक टू-व्हीलर बनवणाऱ्या हीरो कंपनीने एप्रिल महिन्यात डिलर्सना एकही टू-व्हीलर पाठवलेली नाही. 29 एप्रिल रोजी कंपनीने यासंदर्भातील माहिती दिली आहे. कंपनीने म्हटले आहे की, ‘एप्रिलमध्ये डीलर्सना एकही इलेक्ट्रिक टू-व्हीलर पाठवता आलेली नाही. सध्या सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धामुळे सेमीकंडक्टर टंचाई निर्माण झाली असून संपूर्ण क्षेत्र प्रभावित झाले आहे ज्यामुळे उत्पादन थांबले आहे.’

‘कंपनीला चिपचा अभूतपूर्व तुटवडा आणि पुरवठा साखळीतील अडचणींचा सामना करावा लागत आहे’, असे हिरो इलेक्ट्रिकने एका निवेदनात म्हटले आहे.

‘ऑटोमोटिव्ह उद्योग अजूनही आंतरराष्ट्रीय स्तरावर चिपच्या कमतरतेशी झुंज देत आहे ज्यामुळे उत्पादन क्षेत्राचे नुकसान होत आहे. हिरो इलेक्ट्रिकला याचा फटका बसला आणि एप्रिल 2022 मध्ये कंपनी शून्य डिस्पॅच वर आली’, असेही या निवेदनात म्हटले आहे.

‘यामुळे ग्राहकांची प्रतीक्षा यादी 60 दिवसांपेक्षा अधिक दिवसांपर्यंत वाढली आहे आणि काही डीलर्सकडे तर प्रदर्शित करण्यासाठीही स्टॉक नाही,’ असे कंपनीने म्हटले आहे.

या परिस्थितीवर भाष्य करताना, हिरो इलेक्ट्रिकचे सीईओ, सोहिंदर गिल म्हणाले, ‘वेगानं धावणाऱ्या ट्रेनला आपत्कालीन ब्रेक लावण्यासारखी ही परिस्थिती आहे’. पुढे ते म्हणाले ‘आमची विक्री महिना-दर-महिना जवळजवळ दुप्पट होत होती आणि आम्ही वेगवेगळ्या भौगोलिक क्षेत्रांमधून स्त्रोत मिळवून उत्पादनात सातत्य राखले होते. परंतु युद्धा (रशिया – युक्रेन) मुळे एक मोठी पुरवठा साखळी कोलमडली ज्यामुळे हा व्यत्यय आला.’

दरम्यान, या समस्येवर कंपनीने उपायही शोधल्याचे निवेदनात म्हटले आहे. ‘कंपनीने पर्यायी स्रोत उभे केले आहेत आणि लवकरच उत्पादन पुन्हा सुरू होईल,’ असे गिल यांनी सांगितले. दरम्यान, आम्ही आमचे उत्पादन वाढवण्यासाठी आमच्या प्लांटची क्षमता वाढवण्यासाठी काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

इलेक्ट्रिक स्कूटर्सना आग लागण्याच्या अलीकडच्या घटनांबद्दल गिल म्हणाले की, या घटनांनी उद्योग क्षेत्रात जागृती आणली आहे आणि ते पुढे म्हणाले, ‘आमचा विश्वास आहे की सर्वोत्तम कंपन्यांनी देखील आत्मपरीक्षण केले पाहिजे आणि इलेक्ट्रिकवर विश्वास ठेवण्यासाठी त्यांची रचना आणि गुणवत्ता सतत सुधारली पाहिजे.’