खाणं आणि बरंच काही – आला उन्हाळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> आरती देवगावकर

ऋतू दिनचर्या ही संकल्पना आपल्याकडे पूर्वापार चालत आलेली आहे. कोणत्या ऋतूत काय खावे, काय प्यावे, कोणत्या तऱहेचे कपडे घालावेत, काय स्वरूपाचा व्यायाम करावा, यांसारख्या अनेक गोष्टींचा त्यात साकल्याने विचार केला आहे. त्याचा आज आपल्याला विसर पडला आहे. पश्चिमेचे वारे आपल्याला थंड वाटून आपण त्यात वाहवत जातो आहोत. जुने ते सोने असे म्हणून सगळ्या जुन्या गोष्टींना कवटाळून बसणे जसे योग्य नाही तसेच जुने ते सारे त्याज्य आणि कायम नवे ते हवे ही वृत्तीदेखील घातकच!

असे हे ऋतूंचे फिरे चक्र बाळा… उन्हाळा, हिवाळा पुन्हा पावसाळा’ हे ऐकतच आपण मोठे होतो… उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे आपल्या हिंदुस्थानी उपखंडात दिसून येणारे तीन प्रमुख ऋतू आणि त्यात एका ऋतूत दोन असे एकूण सहा ऋतू आपण अनुभवतो. बाकी जगभरात सगळीकडे ऋतूंचे वर्गीकरण वेगवेगळ्या प्रकारे होते. वसंत किंवा स्प्रिंग हा सृष्टीचा लाडका ऋतू असला तरी उन्हाळा हा लोकांना फारसा न आवडणारा ऋतू. अंगाची काहिली करणारा, घामाच्या धारा वाहवणारा उन्हाळा कुणाला आवडणार? बाहेर सगळीकडे रुक्षतेने कळस गाठलेला असतो. हवेच्या झळादेखील गरम भासत असतात. त्यात हल्लीच्या ग्लोबल वार्ंमगच्या काळात दिवसेंदिवस वाढत्या तापमानाने कहर मांडला आहे. बाहेरच्या उष्ण वातावरणात पोटात काही थंड जाणे ही सुखद बाब ठरते. मात्र आपल्या सगळ्यांना हे माहिती हवे की, जिभेला थंड लागणारे पदार्थ परिणामाला मात्र बरेचदा उष्ण असतात. त्यामुळे त्याचे सेवन उन्हाळ्यात टाळावे, असे आयुर्वेद सांगतो.

ऋतू दिनचर्या ही संकल्पना आपल्याकडे पूर्वापार चालत आलेली आहे. कोणत्या ऋतूत काय खावे, काय प्यावे, कोणत्या तऱहेचे कपडे घालावेत, काय स्वरूपाचा व्यायाम करावा, यांसारख्या अनेक गोष्टींचा त्यात साकल्याने विचार केला आहे. त्याचा आज आपल्याला विसर पडला आहे. पश्चिमेचे वारे आपल्याला थंड वाटून आपण त्यात वाहवत जातो आहोत. जुने ते सोने असे म्हणून सगळ्या जुन्या गोष्टींना कवटाळून बसणे जसे योग्य नाही तसेच जुने ते सारे त्याज्य आणि कायम नवे ते हवे ही वृत्तीदेखील घातकच!
आता आधुनिक काळातील माणसे उन्हाळ्यात आपल्या घरांमध्ये एसी, कुलर लावून त्याच्या थंडाव्यात गार होतात. फ्रीजमधील शीतपेयांच्या बाटल्यांमध्ये वाढ होते.

आईस्क्रीमच्या खपाने या सिझनला उच्चांक गाठलेला असतो. त्याचबरोबर आईसफ्रूट, गाडीवर मिळणारे बर्फाचे गोळे, पेप्सीकोला, नि अशाच ढीगभर गोष्टी… या सगळ्याच्या मागे लागताना आपण घरी बनवता येणारी सरबते विसरत चाललो आहोत का? बाहेरून घरात आलेल्या माणसाला आधी गुळाचा खडा देऊन मग माठातील थंड पाणी देणे ही जुनी प्रथा नव्याने पुनरुज्जीवित करायला हवी. बाहेरील उष्णतेमुळे गरम झालेल्या शरीराला एकदम गार पाण्याचा त्रास होऊ नये, त्यासाठी शरीराचे तापमान खाली येईपर्यंत काही वेळ जाऊ देणे योग्य असते. घामाघूम झाल्याने मरगळलेल्या शरीराला तत्काळ ऊर्जा मिळण्यासाठी गुळाचा गोडवा उपयुक्त ठरतो. कोकम, लिंबू, वाळा इत्यादी घरी बनवलेली ताजी सरबते तृषा शमवण्याची उत्तम साधने आहेत. याच मोसमात मिळणाऱया कैऱयांचे केशर-वेलची घालून केलेले ताजे पन्हे रसना तृप्त करते. माठात टाकलेला वाळा किंवा मोगऱयाची चार फुले त्याच्या सुगंधाने पाण्याला अधिकच शीतल बनवतात.

निसर्ग ऋतुमानानुसार फळे, फुले यांची निर्मिती करत असतो. आता तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कोणतेही फळ कोणत्याही ऋतूत मिळत असले तरी अजूनही काही फळे फक्त उन्हाळ्यातच मिळतात. करवंदे, जांभळे, बोरे या रानमेव्याचा आनंद लुटताना याच काळात उपलब्ध होणारी कलिंगड, खरबूज, द्राक्षे, फणस यांसारखी फळेही आवर्जून खायला हवीत. या फळांचे अनेकविध पदार्थ घरोघरी बनतात. काही पदार्थांच्या माध्यमातून वर्षभर या फळांचा आस्वाद घेता यावा याची तजवीज लोक करून ठेवतात. तरी ताजे ते ताजे, त्याची सर बाकी कशाला नाही. फळांचा राजा असणाऱया आंब्याचे या ऋतूतील आगमन हा लहानथोरांच्या आनंदाचा भाग. अनेकविध जातींच्या आंब्यांची आणि त्यापासून बनणाऱया विविध पदार्थांची या काळात लयलूट असते. कैरीच्या निरनिराळ्या प्रकारांनी केल्या जाणाऱया आंबटगोड, तिखट चटण्या जेवणाची लज्जत वाढवतात. नुसती तिखटमीठ लावलेली कैरी पाहूनदेखील तोंडाला पाणी सुटते. प्रत्येक प्रदेशात तिथल्या वातावरणाला साजेशी, त्या भागात शरीराला आवश्यक असणारी फळे, भाज्या यांचे उत्पादन होत असते. एरवी खाताना कधी त्रास झाला तरी नैसर्गिक हंगाम असताना खाल्लेल्या फळांचा त्रास होत नाही. म्हणजे बघा हं, स्थूल व्यक्तींना वजन वाढू नये म्हणून खाण्यावर अतिशय ताबा ठेवावा लागतो. मात्र उन्हाळ्यात रोज सकाळी त्यांनी एक आंबा नाश्त्यात खाल्ला तरी त्यांच्या वजनावर परिणाम होत नाही. अर्थात संख्येवर मर्यादा हवीच. पोटभर आंबे खाणे त्यांना निषिद्धच! त्यांनाच कशाला, सर्वांसाठीच ‘अति सर्वत्र वर्जयेत्’ या काळात आणखी काय केले जाते हे पुढच्या भागात पाहू. तोवर मस्त खा नि स्वस्थ राहा.

(लेखिका अनुवादक आणि समतोल या दिवाळी अंकाच्या संपादक आहेत.)
n [email protected]