
मुंबई महानगरपालिकेत गेल्या दोन वर्षांत कोरोना काळात आरोग्य विभागाची महत्त्वपूर्ण जबाबदारी यशस्वीपणे सांभाळणारे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी उद्या, 30 एप्रिल रोजी वयोमानाप्रमाणे निवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडील कारभाराची जबाबदारी अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीवकुमार यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी डिसेंबर 2019 रोजी मुंबई महानगरपालिकेत विविध विभागांची जबाबदारी हाती घेतली. त्यांच्यावर महत्त्वपूर्ण आरोग्य विभागासह अग्निशमन दलाचीही जबाबदारी सोपविण्यात आली होती. सद्यस्थितीत त्यांच्याकडे अतिरिक्त आयुक्त पश्चिम उपनगरे, आरोग्य विभाग, मेडिकल एज्युकेशन, आपत्कालीन विभाग, घनकचरा व्यवस्थापन, सुरक्षा विभाग, शिल्पग्राम अंधेरी, डंपिंग ग्राऊंड, पर्यावरण संबंधित बाबी, खरेदी विभाग आदी जबाबदाऱया होत्या. त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्याकडे असलेल्या विभागांची जबाबदारी अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीवकुमार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत संजीवकुमार यांच्याकडे ही जबाबदारी राहणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.






























































