
मालवण तालुक्यातील ऐतिहासिक धामापूर तलावातील मासे मृत होत आहेत. पाण्यावर मोठ्या प्रमाणात मृत मासे तरंगताना दिसत आहेत. तलाव किनारी मृत माशांचा खच पडला असून संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे. पाण्याचा रंगही काही प्रमाणात काळसर झाला आहे.
धामापूर येथील ऐतिहासिक भगवती मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या धामापूर तलावाच्या सुमारे 450 वर्षाच्या इतिहासात प्रथमच अशी घटना घडल्याचे स्थानिक जाणकार व्यक्तींनी सांगितले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात तलावातील मासे मृत होण्याचे नेमके कारण अजून निश्चित समजून आले नाही. मात्र वाढत्या उष्णतापमानामुळे मासे मृत होत असतील असा अंदाज काहींनी व्यक्त केला आहे.
दरम्यान धामापूर तलावाचे पाणी धामापूर, काळसे, गावांसह संपूर्ण मालवण शहराला पिण्यासाठी नळयोजनेमार्फत पुरविले जाते. परंतु आता तलावात आणि काठावर लाखो मासे मृत होऊन पाण्यावर तरंगत असल्याने पाणी दूषित झाले असल्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन ग्रामपंचायत व नगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
काळसे ग्रामपंचायतीच्या वतीने संपूर्ण काळसे गावात दवंडी पिटून धामापूर तलाव नळयोजनेचे पाणी वापरणाऱ्या नागरिकांना नळाचे पाणी पिण्यासाठी न वापरण्याचे आणि पाणी निर्जंतुक करून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच काळसे सरपंच केशव सावंत आणि आरोग्य सेवक गणेश जाधव यांनी तलावाकाठी जाऊन मृत मासे आणि पाण्याची पाहणी केली. लघुपाटबंधारे विभाग आणि जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून पाण्याची तपासणी करावी आणि मृत मासे तलावातून बाहेर काढून पाणी शुद्धीकरण करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
50 दिवसांपासून देऊळ बंद
17 मार्च 2022 पासून गावकऱ्यांमधील अंतर्गत वादावरील प्रशासकीय व न्यायालयीन प्रक्रियेमुळे देवी भगवती मंदिर कुलूपबंद करण्यात आले आहे. मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात आहे. मंदिराच्या इतिहासात प्रथमच एवढे दिवस देवी भगवतीची नित्यपुजा बंद आहे. अश्या स्थितीत याठिकाणी येणाऱ्या भाविकांना देवीचे दर्शनही घेता येत नाही आणि तलाव परिसरात पर्यटन सफर करावी तर मृत माश्यांच्या दुर्गंधीमुळे तीही करता येत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.


























































