
दरवर्षी मार्चच्या मध्यावर सुरू होणारी नालेसफाई या वर्षी 11 एप्रिलला सुरू झाली असली तरी पालिकेने एका महिन्यातच गाळ काढण्याचे टार्गेट पूर्ण करण्याकडे वाटचाल सुरू केली आहे. यामध्ये मोठे नाले, छोटे नाले, पावसाळी गटारे आणि मिठी नदीमधून 907160.96 मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामधील 459809.05 मेट्रिक टन म्हणजेच 50.68 टक्के गाळ आतापर्यंत काढण्यात आला आहे. विशेष म्हणजे मुंबईकरांना आपापल्या विभागातील नालेसफाईची माहिती मिळण्यासाठी पहिल्यांदाच ‘डॅशबोर्ड’ ट्रपिंग सिस्टम सुरू करण्यात आल्याची माहिती पायाभूत सुविधा उपायुक्त उल्हास महाले यांनी दिली.
मुंबईत दरवर्षी मार्चअखेर किंवा मार्चच्या मध्यावर नालेसफाईचे काम सुरू होते. मात्र या वर्षी 8 मार्च रोजी पालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांसह वैधानिक समित्यांची मुदत संपल्याने नालेसफाईच्या कामांचे प्रस्ताव रखडले होते. मात्र पालिका आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी 4 एप्रिल रोजी नालेसफाईच्या प्रस्तावांना मंजुरी दिल्याने 11 एप्रिलपासून नियमितपणे नालेसफाईचे काम कंत्राटदाराच्या माध्यमातून सुरू झाले. आयुक्तांनी नालेसफाईच्या पहिल्याच पाहणी दौऱ्यात कंत्राटदारांना 15 मेपर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवून काम करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार काम केल्याने महिनाभरातच 50 टक्के काम पूर्ण करण्यात आले असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. यावेळी उपमुख्य अभियंता पर्जन्य जलवाहिन्या पूर्व उपनगरचे विभास आचरेकर आदी अधिकारी उपस्थित होते.
डिटेल मोबाईलवर, थेट करा तक्रार
पालिकेच्या नालेसफाईवर समाजमाध्यमांमधून अनेक वेळा आरोप केला जातो. त्यामुळे मुंबईकरांना आपल्या नाल्यांच्या सफाईची माहिती मोबाईलवर मिळण्यासाठी पालिकेने नालेसफाईचा डॅशबोर्ड तयार केला आहे. पालिकेच्या ‘मायबीएमसी’ या बेवसाईटवर ही सुविधा असून या ठिकाणी आपला वॉर्ड, नाल्याचे नाव टाकल्यानंतर कामाचे सर्व डिटेल्स समोर येत आहेत. नालसफाईबाबत कोणत्याही तक्रारी असल्यास तक्रार करण्यासाठी दूरध्वनी क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
गाळाच्या वजनानुसार कंत्राटदाराला मोबदला
– नाल्यांमधून काढण्यात येणारा गाळ नाल्यांच्या काठावर सुकवल्यानंतर डंपरच्या माध्यमातून मुंबईबाहेर नेला जातो.
– पूर्व उपनगर, शहरातील गाळ भिवंडी येथे तर पश्चिम उपनगरातील गाळ मीरा रोड येथे डंपिंगसाठी नेला जातो.
– गाळ वाहनांमध्ये भरताना, भरल्यानंतर आणि डंपिंगवर रिकामा केल्यानंतर पह्टो काढले जातात.
– या वजनानुसार कंत्राटदाराला मोबदला दिला जातो. पंत्राटदाराला प्रतिमेट्रिक टन 1609 रुपये दिले जातात.
असे होतेय काम
– एकूण 100 टक्के नालेसफाईपैकी 75 टक्के गाळ पावसाळय़ापूर्वी 31 मेपर्यंत काढण्यात येतो. तर पावसाळय़ात 10 टक्के तर पावसाळय़ानंतर 15 टक्के नालेसफाई करण्यात येते.
– या वर्षीच्या नालेसफाईत आयुक्तांच्या निर्देशानुसार तीन शिफ्टमध्ये काम करण्यात येत आहे. नालेसफाईवर नजर ठेवण्यासाठी सर्व सातही परिमंडळात भरारी पथक ठेवण्यात आले आहे.
मुंबईतील नदी, नाले
मुंबईत एकूण नद्या 5
एकूण छोटे नाले 1508 (लांबी 605 किमी)
एकूण मोठे नाले 309 (लांबी 290 किमी)
रस्त्याखालील ड्रेन 3134 किमी




























































