
>> शिरीष कणेकर
बातमी सर्वत्र वृत्तपत्रांतून छापून आलेली असली तरी ती खरी आहे. माजी कसोटीपटू अरुण लाल यानं वयाच्या 66 व्या वर्षी त्याच्यापेक्षा 28 वर्षांनी लहान असलेल्या रूपवतीबरोबर दुसरा विवाह केला. थांबा, जरा थांबा. सहासष्टाव्या वर्षी कोणी पाट लावला (पाट लावणे म्हणजे पुन्हा बोहोल्यावर चढणे, म्हणजे पुनर्विवाह करणे.) तर तो तरुण व सुंदर महिलेच्या गळय़ात मंगळसूत्र घालेल, म्हाताऱया घोडीला घेऊन घोडीवर कशाला बसेल? मुख्य म्हणजे अरुण लालच्या पत्नीची या विवाहाला संमती आहे.
आ? आयला! आपणही घरी विचारून बघायला काय हरकत आहे? नवरा ‘नाही’ची अपेक्षा करतोय तेव्हा ‘होय’ म्हणावं अशी तिची बुद्धी चालेलही. आपण प्रथमच तिच्या बुद्धीला दाद देऊ. नसलेल्या बुद्धीला. अरुण लालनं मात्र कमाल केली. आम्हा तमाम ज्येष्ठ नागरिकांच्या मनातील सुप्त इच्छांना त्यानं वाचा फोडली. पण या वयात तरुण बायको कशी मिळवतात? ती नक्की काय पाहून सहासष्ट वर्षांच्या माणसाशी लग्न करायला तयार होते? यापुढे आणखी किती काळ तो तिला साथ देईल असं तिला वाटत असतं? (सलामीला खेळतानाही त्यानं कोणाबरोबर मोठय़ा भागीदाऱया केल्याचं आठवत नाही.)
बुलबुल हे अरुण लालच्या नवसाच्या द्वितीय भार्येचं नाव. लग्नात बायकोचं नाव बदलण्याऐवजी अरुण लालनं स्वतःचं नाव बदलून बुलबुलतरंग ठेवलं असावं. लग्नात अरुण लालचा दिल्ली रणजी संघातील सहकारी गायला असेल – ‘मेरे यार की शादी है.’ तिकडे बुलबुल म्हणत असेल- ‘तू मेरा है दुल्हा, मै तेरी दुल्हन.’ करवली म्हणून अरुण लालची बॅट ठेवली असेल. इतक्या बेभरवशाच्या करवलीवर विसंबून राहणं अरुण लाललाही जड गेलं असावं.
नवीन संसाराची घडी बसवणं अरुण लालला प्रतिपक्षाची वेगवान गोलंदाजी खेळण्याइतपंच कठीण गेलं असणार. क्रिकेटमध्ये संघाच्या इज्जतीचा प्रश्न होता; इथं स्वतःच्याच इज्जतीचा प्रश्न होता.
सहासष्टाव्या वर्षी नवीन विकेटवर ‘गार्ड’ घ्यायचा, विकेट बॅटनं ‘टॅप’ करून आजमावून बघायची आणि प्रसंगानुरूप खेळायचं खायचं काम नाही. वय विरोधात, विरोधी माणसं कधी अपयशी ठरतोय याच्याकडे डोळे लावून बसलेली. बिच्चारा अरुण लाल! घी देखा लेकिन बडगा नाही देखा!
अरुण लालच्या प्रथम पत्नीविषयी दोन टोकाचे प्रवाद आहेत. तिचं नाव रीना. (ती बुलबुल तर ही कोकिळा असायला काय हरकत होती?) वृत्तपत्रानुसार रीनाची या द्वितीय विवाहाला मान्यता आहे. ‘गुगल’, ‘यू टय़ुब’ या मोबाईल आयुधांनुसार अरुण लाल-रीना यांचा रीतसर घटस्फोट झालाय. मग काय अर्थ आहे? घटस्फोटानंतर कोणीही लग्न करतो. आपणही करू. आपल्यापुढचा प्रश्न तो नाही. आपल्यापुढचा प्रश्न आहे की, आपल्याशी लग्न कोण करील हा. पहिलंच कसंबसं झालं होतं. आता दुसरं? तरुण व सुंदर दुसरी पत्नी? पहिली काय तिच्या साड्यांना इस्त्री करत बसणार? की तिच्या केसातला गुंता काढणार? की तिच्या तथाकथित विनोदांना हुकमी हसणार? की तिची नखं रंगवणार?… आपण वृत्तपत्रांवर विश्वास ठेवूया. (त्यांनी मला घरी बसवलं असलं तरी!) रीनानं निश्चित अरुणला बुलबुलशी लग्न करायला उदार अंतःकरणानं संमती दिली असणार.
नव्यानं घडी बसवताना अरुण लालला सुरुवातीला थोडा त्रास होईल. म्हणजे मुलांना (रीनाच्या हो, बुलबुलला लगेच कशी मुलं होणार?) सांगताना की, ही तुमची ममी नाही, तर ही तुमची नवी कोरी ममी. नोकरांना सांगताना की, ही तुमची मालकीण नाही, तर ही तुमची परीटघडीची मालकीण.
सहासष्टाव्या वर्षी अरुण लाल जर लग्न करू शकतो तर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन का करू शकत नाही? रोहित शर्मा व अरुण लाल ही सलामीची जोडी कशी वाटते? दोन-दोन लग्नाच्या बायका घरी वाट बघत असल्याने अरुण लाल लवकर विकेट देऊन घाईघाईनं घरी परतेल. रीना त्याच्यासाठी डोसा करेल व बुलबुल सांबार करेल. अरुण लाल (खाण्यावर) तुटून पडेल. पण चटणी करायला तिसरी बायको हवी असं त्याच्या मनानं घेतलं व तो आणखी एखादी बेडरूम असलेला फ्लॅट शोधत विवाहविषयक जाहिराती बघू लागला तर…?
shireesh [email protected]





























































