
लग्न समारंभात चोरी करणाऱ्या सराईताला कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आणून 80 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. आठवड्यापुर्वी त्याने रेसिडेन्सी क्लबमध्ये रिसेप्शन सुरू असताना नवरदेवीच्या भावाची साडेपाच लाखांची रोकड असलेली बॅग चोरली होती. जॉन सॅम्युअल पंडित (वय 58, रा. कोंढवा, मूळ-मंगळवार पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी 44 वर्षीय व्यक्तीने कोरेंगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
तक्रारदाराच्या बहिणीचे रिसेप्शन 3 मे रोजी कोरेगांव पार्क येथील रेसिडेन्सी क्लबमध्ये आयोजित केले होते. त्यावेळी तक्रारदार फोटो काढण्यासाठी गेल्याची संधी पाहून चोरट्याने 5 लाख 50 हजारांची रोकड असलेली बॅग चोरून नेली. याप्रकरणी कोरेगांव पार्क पोलीस आरोपीचा शोध घेत होते. रिसेप्शनमधील व्हिडीओ शुटींग तपासले असता, त्यामध्ये एकजण संशयितरित्या दिसून आला. तो कोणाच्या ओळखीतील नसल्यामुळे पोलिसांचा त्याच्यावरचा संशय बळावला. तपास पथक आरोपीचा शोध घेत असताना चोरटा सोमवार पेठेत फिरत असल्याचे पोलीस नाईक विशाल गाडे यांना दिसून आले. पथकाने सापळा रचून जॉन पंडीत याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून रोकड, दागिने, दुचाकी जप्त केली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त सागर पाटील, एसीपी आर. एन. राजे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक वेताळ, पोलीस निरीक्षक दीपाली भुजबळ, उपनिरीक्षक अमोल घोडके, दीनेश शिंदे, नामदेव खिलारे, बालाजी घोडके, संदीप जढर, विशाल गाडे, अझरूद्दीन पठाण, संदीपकुमार गर्जे यांनी केली.


























































