शरद पवार यांचे वक्तव्य अर्धवट दाखवून चुकीचा संदेश देण्याचा भाजपचा प्रयत्न, गृहखाते करणार ‘त्या’ ट्विटची चौकशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एक व्हिडीओ भाजपकडून सोशल मीडियावर मोठय़ा प्रमाणात व्हायरल केला जात आहे. भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शरद पवार यांच्या वक्तव्याचा अर्धवट व्हिडीओ दाखवून समाजात चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गृहखात्याने याची गंभीर दखल घेतली असून भाजपकडून करण्यात आलेल्या ‘त्या’ ट्विटची चौकशी करून कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

भाजप महाराष्ट्राने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शरद पवार यांनी साताऱयात केलेल्या भाषणाचा व्हिडीओ पोस्ट करत पवारांवर गंभीर आरोप केला आहे. नास्तिक शरद पवार यांनी हिंदू देवी देवतांचे बाप काढलेत. पवार नेहमीच हिंदू धर्माचा द्वेष करतात असे भाजपने म्हटले आहे. मात्र या व्हिडीओवरून भाजप गोत्यात येण्याची शक्यता आहे. कारण अर्धवट व्हिडीओ शेअर केल्याप्रकरणी कारवाई करण्याच्या हालचाली गृह विभागाने सुरू केल्या आहेत. शरद पवार यांनी आपल्या भाषणात एका कवितेचा संदर्भ देत तिचा अर्थ सांगितला होता. मात्र भाजपने एडिटेड व्हिडीओ व्हायरल केला, असे राष्ट्रवादीचे म्हणणे आहे.

पवार नेमके काय म्हणाले?

भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात शरद पवार यांनी जवाहर राठोड यांच्या एका कवितेचा उल्लेख केला. ‘आम्ही आमच्या चिनी हातोडय़ांपासून बनवलेल्या जात्यामुळे आज अनेकांचे पोट भरत आहे. यासोबतच आम्ही अनेक गोष्टी बनवल्या. तुम्ही ज्यांची पूजा करता ते ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या मूर्ती आम्ही आमच्या चिनी हातोडय़ांपासून घडवल्या. त्या तुम्ही मंदिरात ठेवल्या आणि आता आम्हाला मंदिरात येऊ देत नाहीत. तुमच्या देवाचे बाप आम्ही आहोत. त्यामुळे आमच्यावर झालेला अन्याय आम्ही सहन करणार नाही’, असे राठोड यांनी आपल्या कवितेत म्हटल्याचे पवार यांनी सांगितले.

भाजपचा आरोप काय?

शरद पवार यांच्या या वक्तव्यावर भाजपकडून ट्विटरवर आरोप केला गेला. नास्तिक शरद पवार यांनी हिंदू देवीदेवतांचे बाप काढलेत. पवार नेहमीच हिंदू धर्माचा द्वेष करतात. पवारांनी हिंदू धर्माची बदनामी केली नसती, जातीवाद केला नसता, देवीदेवतांचा अपमान केलाच नसता तर ते एवढे मोठे झालेच नसते. पवार साहेब, या वयात आपल्याला शोभेल असेच वक्तव्य करा’ असे ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यासोबत पवार यांच्या साताऱयातील भाषणाचा अर्धवट व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.