
- ऋतुजा फडके
कालिदासाइतकाच नावारूपाला आलेला आणखी एक कवी, नाटककार म्हणजे महाकवी भास. आपल्या रससिक्त नाटकांनी माणसांची हृदये जिंकणाऱया भासाचे जीवनवृत्त मात्र तिमिराछन्नच राहिलं. भासाच्या काळामध्ये आपल्या देशात आत्मकथा लिहिण्याची प्रथा नव्हती. त्यामुळे भासाने कधीच नाटकाच्या सुरुवातीला स्वपरिचय दिला नाही. त्यामुळे भासाने लिहिलेली नाटके, त्याचा काळ यावर कायमची प्रश्नचिन्हंच उमटली.
कालिदासाइतकाच नावारूपाला आलेला आणखी एक कवी, नाटककार म्हणजे महाकवी भास. आपल्या रससिक्त नाटकांनी माणसांची हृदये जिंकणाऱया भासाचे जीवनवृत्त मात्र तिमिराछन्नच राहिलं. भासाच्या काळामध्ये आपल्या देशात आत्मकथा लिहिण्याची प्रथा नव्हती. त्यामुळे भासाने कधीच नाटकाच्या सुरुवातीला स्वपरिचय दिला नाही. त्यामुळे भासाने लिहिलेली नाटके, त्याचा काळ यावर कायमची प्रश्नचिन्हंच उमटली; पण सन 1909 मध्ये टी.गणपती शास्त्र्ााr यांनी यावरची सगळी उत्तरं शोधली. त्यांना भासाने लिहिलेल्या नाटकांची हस्तलिखिते मिळाली आणि तेव्हापासून भासाच्या 13 नाटकांचं ‘भासनाटकचक्र’ प्रसिद्ध झालं. यावर आजही अनेक मतं-मतांतरे आहेत. तरीही बऱयापैकी हीच नाटके प्रमाण मानली जातात.
‘भासनाटकचक्रा’तील विषय प्रचलित कथा, आख्यायिका, इतिहास, प्राचीन महाकाव्ये अशांचा आधार घेतलेले असतात. मात्र मुख्य नाटय़वस्तू एका मध्यवर्ती पात्राच्या भोवती गुंफण्याची भासाची हातोटी आहे. बऱयाचशा नाटकांत हरवलेल्या, गमावलेल्या राज्याची पुनर्प्राप्ती हे मध्यवर्ती सूत्र आहे. एका सूत्राभोवती कथावस्तू रचताना एकंदर चौकट तशीच ठेवून मूळ कथेत बदल करण्याचे विलक्षण सामर्थ्य भासाकडे आहे. भासाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे भास पात्रांच्या मनपटलात जाऊन पात्रचित्रण करतो. पात्रनिर्मिती करताना प्रचलित कथांमध्ये दुष्ट म्हणून रूढ झालेली जनमानसात तशीच रुजलेली पात्रं भास नव्याने उभी करतो. त्यांच्यातली माणुसकी भास शोधतो आणि ती प्रेक्षकांच्या अशा पद्धतीने पचनी पाडतो की, जगाला त्यांच्या मूळ दुष्ट प्रवृत्तीचा विसरच पडतो.
भासाने नाटकात वापरलेल्या रसाविष्कारांविषयी बोलायचं झालं तर भासाच्या नाटकात वीर, रौद्र, करुण हे रस प्रामुख्याने दिसून येतात. आज आपण वीर आणि रौद्र रसांमध्ये बांधलेल्या भासाच्या एक अंकी नाटक असलेल्या ‘मध्यमव्यायोग’विषयी बोलणार आहोत.
‘मध्यमव्यायोग’ हे नाटक भरतमुनींनी सांगितलेल्या दहा नाटकांच्या प्रकारांपैकी ‘व्यायोग’ या प्रकारात मोडतं. विशेष म्हणजे ही एकांकिका आहे. संपूर्ण कथावस्तू भासाने एका अंकात बांधलेली आहे. या नाटकाची कथा भीम, घटोत्कच, हिडिंबा या तीन पात्रांभोवती घडते. या नाटकाचं ठिकाण म्हणजे ज्या वनामध्ये पांडव वनवासासाठी गेले होते आणि तिथे एका ब्राह्मण कुटुंबाचा आश्रय घेऊन राहत होते. हिडिंबा एक राक्षसी, भीमाची पत्नी हिला आपला पुत्र घटोत्कच आणि त्याचे वडील भीम यांची भेट घडवून आणायची असते. त्यामुळे ती घटोत्कचाला आज माझ्या उपवासाला एक मध्यम असलेला (दुसऱया क्रमांकाचा ) ब्राह्मण पुत्र भोजनासाठी आणून दे म्हणून सांगते आणि घटोत्कच त्या वनामध्ये राहत असलेल्या एकमेव अशा ब्राह्मण कुटुंबाच्या दारात येऊन पोचतो. घटोत्कच हा राक्षसी पुत्र म्हणजे वीररस त्याच्या नसानसांत भरलेला. घटोत्कच आपल्या प्रवेशाची सुरुवातच,
भो ब्राह्मण! तिष्ठ तिष्ठ
किं यासि मद्भयविनाशितधैर्यसारो वित्रस्तदारसुतरक्षणहीनशत्ते!
र्ताक्ष्याग्रवक्षपवनोद्धतरोषवन्हितीव्रः कलत्रसहितो भृजगो यथार्तः
– अरे ब्राह्मणा, तिथेच थांब. थांब तिथेच. भयभीत झाल्यामुळे आपल्या मुलांचे आणि पत्नीचे रक्षण करण्यास असमर्थ असणाऱया ब्राह्मणा, मला बघून घाबरल्यामुळे तुझे सगळे धैर्य नष्ट झाले आहे. तरीसुद्धा गरुडाच्या अग्रभागी असलेल्या ज्याचा क्रोधाग्नी प्रज्वलित झाला आहे असा तू सपत्नीक पळत सुटला आहेस. अरे…थांब…(पुढे पाऊल टाकशील तर माझ्याशी गाठ आहे).
हे ऐकून खरं तर ब्राह्मण कुटुंब घाबरतं, पण ब्राह्मण आपल्या कुटुंबाला दिलासा देण्याचा प्रयत्न करतो आणि घटोत्कचाला विनवण्या करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा घटोत्कच ब्राह्मण सगळीकडे पूजनीय आहेत हे त्याला माहीत आहे, पण माझ्या आईच्या आज्ञेचं पालन करणं माझं कर्तव्य आहे असं सांगतो आणि मला तुम्ही नाही, तर तुमचा मध्यम पुत्र हवा आहे. तुम्ही माझी वाट मोकळी करा, असेही ब्राह्मणाला सांगतो आणि ‘‘अरे मध्यमा, मध्यम पुत्रा बाहेर ये’’ अशा आरोळ्या द्यायला सुरुवात करतो. ‘‘मध्यम मध्यम’’ असं पुन्हा पुन्हा ऐकून भीम बाहेर येतो. भीमाच्या आकृतीकडे पाहून घटोत्कच काही क्षण तसाच पाहत उभा राहतो आणि भीमाला ‘‘तू मध्यम आहेस?’’ असा प्रश्न करतो. हळूहळू भीमाला घटोत्कचाकडे पाहून, त्याच्याशी संवाद साधून हा आपल्यासारखाच असल्याचा भास व्हायला लागतो, पण तरीसुद्धा भीम आणि घटोत्कच यांच्यामध्ये शाब्दिक आणि शारीरिक दोन्ही लढाया जुंपतात. (क्रमशः…)



























































