शिरीषायन- रेशम मुलायम कंठ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिरीष कणेकर

नाशिकला प्रसाद दत्तानंद कुलकर्णी नावाचे माझे वाचक आहेत. त्यांच्या वडिलांना तलत महमूद अतिप्रिय होता. जणू काळजाचा तुकडाच. ते तलतचा उल्लेख नेहमी ‘माझा तलत’ असा करीत. एके दिवशी ते रडवेल्या चेहऱयानं मलूल बसले होते.
‘काय झालं बाबा?’ लेकानं विचारलं.
‘अरे, माझा तलत गेला रे’ ते उन्मळून म्हणाले.
तलत गेला तेव्हा आपली सगळ्यांचीच नेमकी हीच अव्यक्त भावना होती… ‘माझा तलत गेला रे!’
मीच कोणे एके काळी ‘यादो की बारात’ या माझ्या स्तंभातून लिहिलं होतं- ‘परमेश्वरानं माणसाला दिल दिलं आणि मग या दिलाला पाझर फोडण्यासाठी, रडविण्यासाठी नि रक्तबंबाळ करण्यासाठी तलत महमूद नावाचं मोरपिसी शस्त्र्ा अवनीवर धाडून दिलं. दर्द हा तलतच्या गाण्याचा आत्मा आहे. कारुण्य हे त्याच्या आवाजाचं मर्म आहे. तागडी घेऊन सूर तोलणाऱया बनियांसाठी किंवा स्वरांचं विच्छेदन करणाऱया मुडदेफरासांसाठी ही हळवी, हळुवार रुलानेवाली कातर चीज नाही. हा खास दिलवाल्यांचा सवतासुभा आहे. आयुष्याचा काटेकोर हिशेब मांडणाऱया बुद्धीवादी कारकुंडय़ांना इथं मज्जाव आहे…’
वांद्रा समुद्रकिनाऱयावरील तलतच्या टुमदार बंगलीत खाली जाजमावर बसून तो लावत असलेली त्याची अप्रतिम गाणी ऐकत मी नागासारखा डोलत होतो. एकाएकी मी त्याला विचारलं, ‘तू एकेकाळी एस. डी. बर्मनचा लाडका होतास नं?’
‘एस.डी.ची लाडकी माणसं सारखी बदलत असतात’ तलत ओठ मुरडून म्हणाला. पार्श्वभूमीवर अचूक टायमिंग साधून त्याचं एस.डी.कडचं गाणं वाजत होतं – ‘जाये तो जाये कहाँ?’

तलत माणूस म्हणून त्याच्या आवाजासारखाच कोमल व रेशमी मुलायम होता. तो आयुष्यात कोणाशी भांडला असेल किंवा त्यानं कुणाला दुखावलं असेल असं वाटत नाही. सैगलप्रमाणे गायक-नट होण्याची त्याची इच्छा पार धुळीस मिळाली. ‘दिले नादान’, ‘डाकबाबू’, ‘वारिस’, ‘रफ्तार’, ‘एक गावकी कहानी’, ‘सोने की चिडिया’ हे त्याचे चित्रपट मुळीच चालले नाहीत. त्यानं कधी चित्रपटांना संगीत दिलं नाही, पण नाव न देता त्यानं संगीतबद्ध केलेली अनेक खासगी गीते व गजला गाजल्या. उदा. ‘तुमने ये क्या सितम किया’, ‘गमे आशिकी से कह दो’, ‘गुनगुनाते हुवे गाते हुवे’, बिदाकी बेला तुमने कहा था…
तलतच्या गाण्यात निर्व्याज आनंद व निर्भेळ सुख फार क्वचित आढळतं. ‘रो रो बीता जीवन सारा’ हेच शेवटी खरं. अपार दुःख व व्यथा त्याच्या पाचवीला पुजलेल्या असतात. ‘मितवा नही आये’ या तीन शब्दांत तलतच्या गाण्यातली दर्दभरी दास्तां ठासून भरल्येय.

मला अतिशय भावणारी तलतची दहा एकलगीते देत आहे –
1) ‘ये हवा ये रात ये चाँदनी’ – ‘संगदिल’ – सज्जाद हुसेन
2) ‘मै दिल हूँ इक अरमान भरा’ – ‘अनहोनी’ – रोशन
3) ‘शामे गमकी कसम’ – ‘फुटपाथ’ – खय्याम
4) ‘जिंदगी देनेवाले सुन’ – ‘दिले नादान’ – गुलाम महंमद
5) ‘सपनोंकी सुहानी दुनियाको’ – ‘शिकस्त’ – शंकर – जयकिशन
6) ‘शुक्रिया ऐ प्यार तेरा’ – ‘आराम’ – अनिल विश्वास
7) ‘मै पागल मेरा मनवा पागल’ – ‘आशियाना’ – मदन मोहन
8) ‘मुहोब्बतही न जो समझे’ – ‘परछाई’ – सी. रामचंद्र
9) ‘ऐ दिल मुझे ऐसी’ – ‘आरजू’ – अनिल विश्वास
10) ‘जलते है जिसके लिये’ – ‘सुजाता’ – एस.डी.बर्मन

माझ्या एका कार्यक्रमात मी लताच्या हस्ते तलतचा सत्कार करवला होता. तलत मंचावर आला आणि लता हरखून गेली. तलत आधी भारावला व मग सद्गदित झाला. त्याचा सत्कार होत असताना आम्ही पार्श्वभूमीवर त्याचं आणि लताचं ‘संगदिल’मधील अजरामर द्वंद्वगीत ‘दिलमे समा गये सजन’ लावलं होतं. लता आणि तलत दोघंही त्या जमान्यात हरवून गेले. ‘सीने मे सुलगते है अरमान’, ‘जब जब फूल खिले’, ‘दिले बेकरार सो जा’ ही त्यांची द्वंद्वगीतेही त्या दिवशी वाजवायला हवी होती का?
तलतच्या आवाजाचा ‘कापरा आवाज’ असा उल्लेख मला मुळीच मान्य नाही. ‘चाँद मेरा बादलोंम’s (पठाण) व ‘तेरी आँख के आंसू’ (‘जहाँआरा’) या गाण्यात त्याचा आवाज उतरणीला लागला होता, पण त्यापूर्वीचा तलत निव्वळ मध होता. ‘प्यार पर बस तो नही है मेरा’ एकदा ऐका तरी!
तलत पाकिस्तानात गेला होता तेव्हा त्याला विचारण्यात आलं की, नूरजहान हिंदुस्थानातच राहिली असती तर लताचं कठीण झालं असतं ना?
तलत तत्परतेनं म्हणाला, ‘नूरजहान हिंदुस्थानात राहिली असती तर लतासमोर तिचं कठीण झालं असतं.’
9 मे 1998 रोजी तलतनं जग सोडलं. आपलं जग संपन्न करून तो गेला. चला, पुन्हा एकदा म्हणू या – ‘माझा तलत गेला रे…’
z [email protected]