
राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात काही मुद्द्यांवरून मतभेद असताना दुसरीकडे राज्य सरकारकडून राजभवनाच्या मागणीवरून खर्चासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो. राज्य सरकारने माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना माहिती दिली आहे की, गेल्या दोन वर्षांत 60 कोटींहून अधिक रक्कम राजभवनासाठी वितरित करण्यात आली आहे. 2019 च्या तुलनेत गेल्या 2 वर्षात राजभवनाच्या खर्चात 18 कोटींची वाढ झाली आहे, असे माहिती अधिकारात उघड झाले आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्य सरकारकडून राजभवन कार्यालयाला सरकारने दिलेल्या निधीची माहिती मागवली होती. सामान्य प्रशासन विभागाने अनिल गलगली यांना अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात समाविष्ट केलेली मागील 5 वर्षांची माहिती उपलब्ध करून दिली आहे. 2017-18 मध्ये राजभवनला 13,97,23,000 रुपये देण्यात आले. राजभवन कार्यालयाने त्यातील 12,49,72,000 रुपये खर्च केले. 2018-19 मध्ये एकूण तरतूद 15,84,56,000 रुपये होती तर त्यातील 13,71,77,000 खर्च करण्यात आली होती. 2019-20 मध्ये तरतूदीची रक्कम 19,86,62,000 होती, त्यापेक्षा जादा रक्कम 19,92,86,000 वितरित करण्यात आली होती. त्यापैकी 17,63,60,000 खर्च करण्यात आले. 2020-21 मध्ये तरतूदीची रक्कम 29,68,19,000 रुपये होती. मात्र, प्रत्यक्षात 29,50,92,000 रुपये वितरित केले गेले, त्यापैकी 25,92,36,000 खर्च करण्यात आले. 2021-22 मध्ये तरतूदीची रक्कम 31,23,66,000 रुपये असताना सरकारने प्रत्यक्षात 31,38,66,000 वितरित केले त्यापैकी 27,38,56,000 राज्यपाल कार्यालयाने खर्च केले.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर राजभवनच्या खर्चात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मागील 2 वर्षात 60,89,58,000 वितरित करण्यात आले. त्यापैकी 53,30,92,000 खर्च झाले. गेल्या 2 वर्षात राजभवनाच्या खर्चात 18 कोटींची वाढ झाली आहे. राजभवन कार्यालयाने वाढीव खर्चाची माहिती सार्वजनिक करून सर्व खर्चाचे ऑडिट करून वेबसाइटवर अपलोड करावे, अशी मागणी अनिल गलगली यांनी केली आहे. अनिल गलगली यांनी हे पत्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवले आहे.
























































