
नागपूरमध्ये रेशीमबाग परिसरातील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसराची आणि आरएसएसच्या मुख्यालयाची रेकी करणाऱ्या जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याला महाराष्ट्र एटीएसने अटक केली आहे. रईस अहमद शेख असादउल्ला शेख (Raees Ahmed Sheikh Asadulla Sheikh) असे अटक केलेल्या दहशतवाद्याचे नाव असून जम्मू-कश्मीरच्या अवंतीपुरा येथील रहिवासी आहे. नागपूरच्या दहशतवादविरोधी पथकाने त्याला अटक केल्याची माहिती ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिली आहे.
Maharashtra | ATS Nagpur gets custody of JeM terrorist Raees Ahmed Sheikh Asadulla Sheikh from Awantipora, Jammu & Kashmir who had conducted recce of Dr Hedgewar Smarak Smriti Mandir of RSS in Reshimbag in July last year; ATS Nagpur probing him for the last two days.
— ANI (@ANI) May 18, 2022
रईस अहमद शेख असादउल्ला शेख याची एटीएसकडून कसून चौकशी सुरू आहे. एप्रिल 2021 मध्ये पाकव्याप्त कश्मीरमधील जैशचा कमांडर ओमर याने रेकी करण्याची जबाबदारी सोपवल्याची माहिती रईस याने दिली आहे. ओमरच्या संपर्कात आल्यानंतर त्याने रईसला नागपुरातील आरएसएसचे मुख्यालय आणि डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसराची रेकी करण्याचे काम दिले होते. त्यानंतर रईस कश्मीरहून विमानाने मुंबईत आणि तिथून नागपुरात पोहोचला होता.
रेकी केल्यानंतर रईस पुन्हा जम्मू-कश्मीरला परतला होता. अखेर जानेवारी 2022 मध्ये त्याला जम्मू-कश्मीर पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याने नागपुरातील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसराची रेकी केल्याचे उघड झाले होते. पुढे या प्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे सोपवण्यात आला. नुकतेच दहशतवाद विरोधी पथकाचे अधिकारी कश्मीरला गेले आणि त्यांनी त्याची चौकशी केली. त्यानंतर पुढील तपासासाठी एटीएसच्या नागपूर युनिटने रईसचा ताबा घेतला.



























































