
माणूस स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. वैद्यकीय किंवा अंतराळ संशोधनातही माणसावर किंवा माणसाला घेऊन एखादा प्रयोग करण्यापूर्वी त्याचा परिणाम इतर प्राण्यांवर कसा होतो याची आधी चाचणी होते. त्यांना ‘गिनी पिग’ म्हणतात.
पहिला माणूस अंतराळात पाठविण्याची कल्पना जेव्हा संशोधकांच्या मनात आली तेव्हा आधी कीटक, फळमाश्या, उंदीर, ससा, कासव, माकड इत्यादी मंडळींना अंतराळात पाठवण्यात आले. पृथ्वीच्या वातावरणात अतिउंच गेल्यावर सजीवांवर काय परिणाम होतो हे तपासण्याचे प्रयोग पार 1781 पासून होतायत. मॉन्टगोकायर बंधूंनी त्या वर्षी एका बलूनला जोडलेल्या बास्केटमधून बदक आणि मेंढरी आधी आकाशात धाडली. हे प्राणी सुखरूप परतलेले पाहून मग माणसाला हुरूप आला. तरीसुद्धा युरी गागारिन 12 एप्रिल 1961 रोजी स्पेसमध्ये जाण्यापूर्वी अनेक प्राण्यांना अंतराळानुभव घ्यावा लागला. त्यातले काही जगले तर काही दगावले.
अंतराळात म्हणजे पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण नगण्य होतं, त्या सीमेपलीकडची वैश्विक पोकळी, तिथे पोहोचेपर्यंत प्राणवायू कमी होतो, वातावरण विरळ होतं. नेमका याचाच परिणाम कीटकांपासून प्राण्यांवर काय होतो, त्यासाठी बऱयाच मोहिमा आखल्या गेल्या.
1947 मध्ये अंतराळात जाणारे पहिले कीटक म्हणजे फळमाश्या (Fruit bees). तेव्हापासून या अंतराळात जाणाऱया मनुष्येतर सजीवांना बायोऍस्ट्रॉनॉट्स म्हटलं जातं. असे प्रयोग करणाऱया देशांमध्ये रशिया, अमेरिका, फ्रान्स, अर्जेंटिना, चीन, जपान आणि इराणचाही समावेश आहे.
1950 मध्ये अंतराळात उंदीर पाठविण्यात आले. 1951 मध्ये कुत्रा, 1959 मध्ये ससा, 1961 मध्ये चिम्पांझी, 1963 मध्ये मांजर, 1968 मध्ये दोन कासव अशा अनेक प्राण्यांनी अंतराळानुभव घेतला. अर्थात त्यांना त्याचं आकलन होण्याचा प्रश्नच नव्हता. माणसाला त्यातून ते समजलं ते म्हणजे आपल्यालाही कधीकाळी अंतराळात जाता येईल.
20 फेब्रु. 1947 रोजी अंतराळात न्यू मेक्सिको येथील रॉकेट तळावरून काही फळमाश्या अंतराळात पाठविण्यात आल्या. म्हणजे सजीव मुद्दाम अंतराळात पाठवण्याचं हे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. त्या माश्या यानातून तीन मिनिटांत 109 किलोमीटरवर पोचल्या. 100 कि.मी. अंतराचं पृथ्वीचं वातावरण भेदून जाण्याचा आणि अंतराळात शिरण्याचा विक्रम त्यांनी त्यांच्या नकळत केला आणि विशेष म्हणजे या सुदूर प्रवासाचा कोणताही विपरीत परिणाम न होता त्या पृथ्वीवर सुखरूप परतल्या! त्यानंतर 14 जून 1949 रोजी अल्बर्ट नावाचं माकड अंतराळात जाणारा पहिला सस्तन प्राणी (मॅमल) ठरला. 22 जुलै 1951 रोजी रशियाने त्सेगन आणि डेझिक ही कुत्र्यांची जोडी अंतराळात पाठवली. तीही यशस्वीरीत्या परतली.
हा सिलसिला आजतागायत सुरू आहे. 2013 मध्ये इराणने कावोश्गर-3 यानातून दोन उंदीर आणि एक कासव अंतराळात धाडले. त्यापूर्वी 1968 मध्ये दोन कासव चांद्र परिक्रमा करून आल्याची नोंद होतीच.
या सर्व प्राण्यांमध्ये अंतराळ संशोधन करणाऱयांसह सर्व जगाला चटका लावून गेली ती रशियाने अंतराळ प्रवासाच्या आरंभीच्या काळात अंतराळात पाठवलेली ‘लायका’ कुत्री! 4 ऑक्टोबर 1957 रोजी स्पुतनिक -1 च्या यशस्वी उड्डाणाने अंतराळाची द्वारं पृथ्वीवासीयांसाठी उघडली. हा प्रयोग केवळ पृथ्वीच्या वातावरणापलीकडे जाण्याचा नव्हता, तर विशिष्ट कक्षेतून (ऑर्बिट) यानाने पृथ्वी प्रदक्षिणा करण्याचाही होता. त्यात यश मिळवून रशियाने इतिहास घडवला.
त्यामुळे त्यांची उमेदही वाढली. आता ‘कॉस्मॉनॉट’ अंतराळात पाठवण्याचे वेध लागले, पण माणूस पाठवायचा तर यान त्याला अंतराळात नेऊन सुखरूप परतही घेऊन आलं पाहिजे! त्याची तयारी सुरू असताना आधी स्पेसमध्ये प्राणी पाठवून परिणाम पाहावा लागणार हे ओघानेच आलं.
…आणि 3 नोव्हेंबर 1957 रोजी रशियाच्या स्पुतनिक -2 मधून (ज्याचं टोपणनाव मतनिक असंही होतं) ‘लायका’ नावाची एक उमदी कुत्री अंतराळात पाठविण्यात आली. पृथ्वीची अंतराळातून परिक्रमा करणारी ती पृथ्वीवरची पहिली सजीव होती. तिचं महत्त्व पुढच्या संपूर्ण अंतराळ मोहिमांमध्ये अनन्यसाधारण आहे. या मूक जिवाला आपण काही अक्षरशः जगावेगळा पराक्रम करतोय याची काय कल्पना असणार! ‘लायका’चा विक्रम पूर्ण झाला. अंतराळयानातून पृथ्वीभोवती फिरण्यात ती यशस्वी झाली… पण पृथ्वीवर परत आलीच नाही!
…कारण 1957 मध्ये अंतराळ प्रवास बाल्यावस्थेत होता. तिथे गेलेलं, पाठवलेलं कोणी पृथ्वीवर परत आणण्याइतकं तंत्रज्ञान पुढारलेलं नव्हतं. त्यामुळे लायकाचं बलिदान मानवजातीसाठी झालं.
…आणि चारच वर्षांत यात प्रगती होऊन रशियाचाच युरी गागारिन अंतराळात जाऊन पृथ्वीभोवती फेरी मारून विजयी होऊन परतला.






























































