
सुरक्षित ठिकाणी पार्क केलेल्या दुचाकींवर पाळत ठेवून संधी मिळताच बनावट चावीने त्या चोरून, नंतर त्याची विक्री करणारी एक टोळी गुन्हे शाखा युनिट-11 च्या हाती लागली आहे. या आरोपींनी केलेल्या तीन गुन्ह्यांची उकल करून पोलिसांनी पाच गाडय़ा हस्तगत केल्या आहेत. आरोपींपैकी दोघे अल्पवयीन आहेत.
मालवणी परिसरात मोटरसायकल चोरणारी टोळी सक्रिय असून ते मार्वे रोडवरील लोटस तलावासमोर चोरीची दुचाकी विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, भरत घोणे, एपीआय अभिजित जाधव, विशाल पाटील व पथकाने त्या ठिकाणी सापळा रचला. दरम्यान दोन दुचाकीवरून तिघे जण तेथे येताच पोलिसांनी त्यांच्यावर झडप घातली. तिघांच्या ताब्यात मिळालेल्या दोन्ही गाडय़ा चोरीच्या निघाल्या. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून आणखी तीन गाडय़ा हस्तगत केल्या. या तिघांना पकडल्यामुळे मोटरसायकल चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींपैकी एक 17 तर दुसरा 15 वर्षांचा आहे. हे तिघे जण पार्क केलेल्या मोटरसायकलींवर वॉच ठेवतात. मग संधी मिळाली की बनावट चावीच्या सहाय्याने दुचाकी चोरून नेतात. त्यानंतर चोरीच्या गाडय़ा विकतात अशी आरोपींची गुन्हय़ाची पद्धत असल्याचे पोलिसांनी सांगितले.





























































