ललित – काकडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>मंगेश उदगीरकर

आयुष्यातल्या अनोख्या अनुभवांसारखी वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटलेली माणसं मनाच्या कप्प्यात अलगद विसावतात. अल्पकाळ वेडावणारी तर कधी दीर्घकाळ रेंगाळणारी ,पण मनाच्या अंगणात त्यांच्यातली अपूर्वाई तशीच राहते. हे तरल अस्तर उलगडताना भेटलेल्या अवलियांविषयी.

उंची पाच फुटांवर दोन इंच, डोक्यावरच्या विरळ होत आलेल्या आणि डांबरीकरण केलेल्या केसांचा मधोमध भांग पाडलेला, डोईच्या मागे मात्र केसांच्या बटा रुळत असलेल्या. गोल चेहरा, पिटुकले नाक, विस्तीर्ण जिवणी, दाढीमिशा सफाचट, अंगात बुटकेपणा अधोरेखित करणारा लांब बाहय़ांचा बुशशर्ट आणि पॅण्ट. एका भल्या सकाळी या गृहस्थांनी मला नमस्कार घातला!

‘नमस्कार!’

‘नमस्कार, आपण?’

‘मी काकडे, संजय काकडे, तुम्ही मला संजू म्हणू शकता!’
पहिल्याच ओळखीत एवढी सलगी मला परवडणारी नव्हती.

‘कुठले आपण?’ मी चौकशी केली.
‘मी नागपूरचा तिथे मी कॉटन फेडरेशनमध्ये ऑडिटर होतो! शिवाय मी ऑर्केस्ट्रामध्ये गात होतो!’
त्या सव्वापाच फुटी देहाकडे मी आदराने पाहायला लागलो.

‘ऑर्केस्ट्रा?’

‘हो ना! मला गॉडगिफ्ट आहे! किशोरचा आवाज मी हुबेहूब काढतो!’

‘बोलण्याचा की गाण्याचा?

‘हा, हा , तुम्ही फारच विनोदी बुवा! अहो, माझं एक गाणं ऐका, मग तुम्हाला कळेल की मी काय चीज आहे!’
‘म्हणा ना एखादं गाणं! ’ मी आग्रह केला. आणि एक क्षणही न दवडता ते उभे राहिले आणि सुरू झाले!
‘छलते, छलते मेरे ये गीत याद रखना, कभी…’
त्यांच्या बोलण्याच्या बायकी लेहज्यातून त्यांच्या आवाजाचा अंदाज आला होताच. किशोरने पुरुष आणि बाई दोन्ही आवाजात अनेक डय़ुएट्स गायली आहेत, पण त्याच्या बायकी सुरांपेक्षाही काकडेंचा सूर भलताच मुलायम निघाला !

‘ क्या बात!’ त्यांना माझ्याकडून केवळ सज्जनपणापोटी दाद दिली गेली, आणि काकडे पेटले!

‘अहो हे काहीच नाही, गणेशाची आरती मी जेव्हा म्हणतो ना, तेव्हा हुबेहूब लता मंगेशकरांचा आवाज! म्हटलं ना, गॉडगिफ्ट आहे मला!’

‘मग एखादी आरती होऊन जाऊ द्या की!’

काकडे उभे झाले! हात जोडले आणि सानुनासिक आवाजात ‘सुखकर्ता दुखहर्ता वार्ता…’ सुरू केलं! माझ्यासमोर भारतरत्न लता मंगेशकरांचा चेहरा साकार झाला. त्यांच्या एरवीच्या हसऱया चेहऱयावर करुण भाव पसरल्याचा भास होऊन गेला. त्यांना कल्पनेत का होईना, पण इतकं केविलवाणं पाहायची ही पहिलीच वेळ ! पण काकडेंच्या चेहऱयावर मात्र जग जिंकल्याचे प्रसन्न भाव.

‘आहे की नाही हुबेहूब लताचा आवाज?’
त्यांचा आत्मविश्वास बघून मला त्यांचा हेवा वाटायला लागला. हळूहळू त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पदर त्यांच्या बोलण्यातून मोकळे व्हायला लागले आणि या हेव्याचे रूपांतर दयेमध्ये होत गेले.

‘भाऊ, माझ्याबरोबर याल का ?’
‘कुठे ?’
‘रेल्वे स्टेशनवर… रिझर्व्हेशन काढायच होतं ’
मी त्यांच्यासोबत गेलो.
‘हा फॉर्म भरा ना !’
‘अहो सोपंय, मी सांगतो तुम्ही भरा !’

‘ भाऊ, मला इंग्रजी लिहिता येत नाही ना!’ त्यांच्या चेहऱयावरचे व्याकूळ भाव पाहून मला एकाच वेळी धक्का आणि दया या भावनांची अनुभूती येऊन गेली. मी शांतपणे फॉर्म भरला वगैरे वगैरे. पण त्यानंतर ‘काकडे’ माझ्यासमोर उलगडत गेले. ते ऑडिटर वगैरे कधीच नव्हते. किंबहुना ऑर्केस्ट्रामध्येही कधीच नव्हते. कारण एकदा मी त्यांना सहज विचारलं होतं की, तुमच्या ऑर्केस्ट्रामध्ये वाद्यं कोणती होती तेव्हा त्यांनी माझ्याकडे कीव केल्यासारख्या चेहऱयाने ‘तबला, पेटी’ हे उत्तर दिलं होतं.

आयुष्यभर काहीच करता न येणाऱ्या पण स्वतःच्या कोशात रमणाऱया वर्गाचे काकडे हे प्रतिनिधी होते. कल्पनेत रममाण होणाऱया डॉन क्विकझोट यांचा वारसा पुढे नेणारे होते. मुख्य म्हणजे, स्वतःवर खूश होऊन इतरांची कीव करण्याइतपत आत्मविश्वास बाळगणारे होते-आहेत.

सध्या काकडे हा माझा विरंगुळा ठरले आहेत. मी त्यांना गुरुस्थानी मानले आहे!

[email protected]