
>> मंगल गोगटे
यंदाचा मार्च महिना आपल्या देशातल्या अनेक ठिकाणी गेल्या 122 वर्षांतील हिंदुस्थानातील सर्वात उष्ण महिना होता. या महिन्यातील सरासरी तापमान होतं 33.1 डिग्री सेंटिग्रेड. सर्वसाधारणपणे जेव्हा समुद्रसपाटीवर तापमान 40 डिग्रीच्या वर जाण्याची शक्यता दिसू लागते आणि जेव्हा ते त्या भागाच्या नॉर्मल तापमानापेक्षा 5 ते 6 डिग्री सेंटिग्रेडपेक्षा वर जातं तेव्हा आपलं हवामान खातं उष्णतेची लाट आल्याचं जाहीर करतं. हवामान शास्त्रज्ञांच्या मते पृथ्वीवर हरितगृह वायू वाढले की, पृथ्वीच्या तापमानात वाढ होते. कारण दिवसा सूर्यप्रकाशाने तापलेली जमीन त्यातील उष्णता रात्री परत आकाशाकडे उत्सर्जित करू शकत नाही. ती इथेच अडकून राहते.
गेले काही महिने देशातल्या अनेक राज्यांमध्ये येत असलेल्या उष्णतेच्या लाटेबद्दल आपण वारंवार ऐकत आलो आहोत. आताच सरलेल्या मार्च व एप्रिल महिन्यात उन्हाच्या तीव्र झळा जाणवण्यास सुरुवात झाली आणि कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. आपल्या शेजारी देशात पाकिस्तानात अशीच परिस्थिती आहे. आणि असं म्हटलं जातंय की, मे आणि जूनमध्ये हे संकट आणखीनच तीव्र होण्याची शक्यता आहे. उष्णता अधिक वाढणार आहे, असा हवामान तज्ञांचा कयास आहे. स्कॉटलंडमधील हवामान शास्त्रज्ञ स्कॉट डंकन यांनी काही महिन्यांपूर्वी असा इशारा दिला होता की, हिंदुस्थान व पाकिस्तानच्या दिशेने उष्ण हवा वाहत आहे आणि या दोन्ही देशांतील लोकांनी येऊ घातलेल्या उष्ण हवेबाबत सतर्क व्हावं.
या वर्षी पारा 50 डिग्री सेंटिग्रेडच्या वर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे होऊ नये म्हणून डिकार्बनाझेशनची गरज आहे. जसजसं आपल्या ग्रहाचं तापमान वाढतं तसतशी उष्णतेची लाटही अधिक तीव्र होत जाते आणि त्या भागांमध्ये वर्षातला बहुतांश काळ उष्मा जाणवतो. अशा उष्णतेचा सर्वात जास्त त्रास गरीब लोकांना आणि जे उन्हातान्हात कष्ट करतात त्यांना होतो. दरवर्षी जागतिक सरासरी तापमान सुमारे एक अंश सेल्सियसने वाढतं. कोरोना काळात जगातल्या अनेक देशांमधील उत्पादन बंद होतं. प्रकल्प थांबले होते. रस्त्यावरची वाहनंदेखील खूप कमी झाली होती. (दक्षिण मुंबईत तर रस्त्यावर मोर नाचताना दिसले होते.) त्यामुळे त्या काळात कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनात घट झाली होती; परंतु निर्बंध उठवल्यावर मात्र त्यात उच्चांकी वाढ झाली होती. या जागतिक तापमानवाढीच्या समस्येवर विचारमंथन होत आहे. चर्चासत्र होत आहेत. पण खरी गरज आहे ती प्रत्यक्ष प्रयत्न करण्याची.
या वर्षी देशभरात पारा 33.10 डिग्री सेंटिगेडला पोचला तेव्हा असंही लक्षात आलं की, आता हे नेहमीचंच होणार आहे. वळवाचा पाऊस जो वातावरणाचं तापमान कमी करतो तो तर अनेक ठिकाणाहून गायब आहे. ही कमतरता 72 टक्के आहे. मग हवेचं तापमान वाढतच जातं. त्यामुळे तेव्हा पाण्याचं बाष्पीभवन वाढतं आणि पृथ्वीचं आवरण कोरडं पडू लागतं, ज्यामुळे दुष्काळ पडण्याची शक्यता वाढते. अशा उन्हाळय़ाने पाऊस पडण्याची शक्यता वाढते. या वर्षी मेच्या शेवटी पाऊस येणार, असं भाकीत हवामान खात्यानं वर्तवलेलं आहे. (माझ्या शाळेत जाण्याच्या काळात असा मेच्या शेवटी पाऊस पडत असे.) परंतु अशी उष्णता वाढली तर हळूहळू जास्त पाऊस पडू लागेल. जास्त माणसं, जास्त विकास, जास्त झाडांची कत्तल, वाढणारे हरित वायू, जास्त उष्णता, जास्त पाऊस, आणखी जास्त पाऊस, आणखी जास्त व जबरदस्त पाऊस… हे चक्र सुरू होईल.
पाऊस एवढा पडेल की, मानवी जीवनासाठी उपयोगी पडेल एवढं अन्नधान्य पिकणार नाही. मातीचा वरचा थर वाहून गेल्याने धड काहीच उगवणार नाही. जागतिक उष्णतेमुळे आर्क्टिक आणि अंटार्क्टिकवरील बर्फ वितळून समुद्राच्या पाण्याची पातळी वाढेल. मानवी उपयोगासाठी जमीन कमी होईल. उरलेल्याची सुपिकता कमी असेल वा जवळपास नसेलच. माणसाच्या जगण्याचा व टिकून राहण्याचा प्रश्न निर्माण होईल. मानवजातीच्या नाशाची सुरुवात इथे दिसू लागते.























































