किरकोळ कारणावरुन मामाने झाडली भाच्यावर गोळी; तुळजापूर तालुक्यातील घडना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बहिणीला घरचे त्रास देतात म्हणून भाऊ बहिणीच्या घरच्याना विचारणा करण्यास गेला. त्याचे रुपांतर भांडणात झाले आणि रागाच्या भरात मामाने भाच्यावर गावठी कट्टयातुन गोळी झाडली. या घटनेत भाचा जखमी झाला असून मामा फरार आहे. ही घटना तुळजापुर तालुक्यातील बारुळ येथे घडली आहे.

आरोपी भाग्यवान लक्ष्मण गायकवाड (रा. चिकुंद्रा) याची बहिण तुळजापुर तालुक्यातील बारुळ येथे दिली आहे. आरोपीच्या बहिणीला घरचे नेहमी त्रास देतात म्हणून भाग्यवान गायकवाड हा जाब विचारण्यासाठी गेला असता सुरुवातीला भांडण झाले. याचे रुपांतर हाणामारीत झाले. भाच्चा सार्थक मस्के (13) हा वडिलांची बाजू घेतोय म्हणून रागाच्या भरात भाग्यवान गायकवाड याने भाच्चा सार्थकवर गोळी झाडली. वेळीच सार्थकने डावा हात वर केल्यामुळे गोळी कोपराच्या खालून गेली. यात सार्थकच्या डाव्या कोपराला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला तत्काळ सोलापूर येथील अश्विनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

गोळी भाच्चाला लागतातच भाग्यवान गायकवाड हा तेथुन पळून गेला. या बाबत दिगंबर बळी मस्के यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून भाग्यवान लक्ष्मण गायकवाड विरोधात आर्म अँक्ट नुसार गुन्हा दाखल केला असुन आरोपी भाग्यवान गायकवाड हा फरार आहे.

तुळजापूर तालुक्यातील बारुळ येथील घटनेमध्ये आरोपीने गावठी पिस्टल वापरले असून त्याच्याकडे गावठी पिस्टल आले कसे, याचा शोध पोलीस घेत आहेत. गावठी पिस्टलचा पुरवठा करणारी टोळी तालुक्यात सक्रिय आहे काय, याचाही शोध घेण्यात येत आहे. 30 डिसेंबर 2021 रोजी 2 तरुण लातुर रोड वरील पाचुंदा येथे गावठी पिस्टल विक्रीसाठी आले आहेत अशी खबर पोलीसांना मिळाली होती. पोलिसांनी पाचुंदा येथे जात संशयास्पद वाटणाऱ्या राजेंद्र सुरेंद्र कांबळे (रा. खंडाळा), ओंकार प्रदीप कांबळे (रा. काक्रंबा) यांची झडती घेतली असता 2 गावठी पिस्टल सापडले होते. या प्रकरणी अधिक चौकशी केली असता 7 जानेवारी पर्यंत 2 गावठी पिस्टल सापडले होते. 4 मुलांकडे 4 गावठी पिस्टल सापडल्यामुळे पोलीस चक्रावले झाले होते. त्या नंतर ही दुसरी घटना आहे. तालुक्यात शहरात गावठी पिस्टल येतात कोठुन हे शोधणे गरजेचे आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. सई भोरे – पाटील, पोलीस निरिक्षक अजिनाथ काशिद व सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे करत आहेत.