
भरदिवसा सराफावर सुरीने वार करून त्यांना जखमी करीत ज्वेलर्समध्ये दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी 24 तासात अटक केली. ही घटना गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आंबेगाव बुद्रूकमधील ‘वैभवलक्ष्मी ज्वेलर्स’मध्ये घडली होती. गौरव विजय रायकर (वय 25,रा. पोकळे वस्ती, धायरी ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. विनोदकुमार सोनी (वय 42, रा. आंबेगाव बुद्रूक) असे जखमी सराफाचे नाव आहे.
तक्रारदार विनोदकुमार यांचे आंबेगाव बुद्रूकमधील ‘पृथ्वीराज हाइट्स’ इमारतीत ‘वैभवलक्ष्मी ज्वेलर्स’ नावाचे सोने-चांदी विक्रीचे दुकान आहे. गुरुवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास एकाने खरेदीच्या बहाण्याने ज्वेलर्समध्ये प्रवेश करून त्यांच्यावर वार केले होते. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी घटनास्थळी धाव घेत पथकाला तपासाच्या सूचना दिल्या. त्यावेळी सराफावर हल्ल्यातील आरोपी धायरीत आल्याची माहिती पोलीस अंमलदार राहूल तांबे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून गौरव रायकर याला ताब्यात घेतले. ही कामगिरी उपायुक्त सागर पाटील, वरिष्ठ निरीक्षक जगन्नाथ कळसकर, एपीआय वैभव गायकवाड, उपनिरीक्षक नितीन शिंदे, उपनिरीक्षक धिरज गुप्ता रविंद्र चिप्पा, गणेश भोसले, सचिन पवार, हर्षल शिंदे, आकाश फासगे, अभिजित जाधव, गणेश शेंडे, राहूल तांबे, शिवदत्त गायकवाड, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, आशिष गायकवाड, विक्रम सांवत यांनी केली.
























































