
>> अरुण जोशी
आपल्या भरदार स्वरांनी पहिल्या काही मिनिटांतच मैफल मोहित करणारा सुरेल स्वराविष्कार म्हणजे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचा स्वर. सुमारे आठ दशकांची त्यांची प्रदीर्घ गानसेवा. कर्नाटकात सुरू झालेली ही गानयात्रा, देशभरच्या सांगीतिक घराण्यांचा मागोवा घेत अखेर पुण्यात स्थिरावली आणि गुरू सवाई गंधर्वांच्या किराणा घराण्याची स्वरपताका त्यांनी गगनावरी नेली. उस्ताद अब्दुल करीम खां यांचे शिष्य असलेले रामभाऊ कुंदगोळकर म्हणजे सवाई गंधर्व हे पंडित भीमसेन यांचे गुरू. गेल्या आठवडय़ात आपण ज्यांच्याविषयी वाचलं त्या गानतपस्विनी गंगूबाई हनगल यांचे भीमसेन हे गुरुबंधू. त्या भीमसेन यांना भीमण्णा म्हणायच्या.
सूरतालाची आवड भीमसेन यांना अगदी बालपणापासून होती. असं म्हणतात की, गदग या त्यावेळी छोटय़ाशा असलेल्या त्यांच्या गावात बॅण्ड पथक आलं तरी भीमण्णा त्यांच्या तालासुरांच्या साथीने चालत राहायचे. मग घरी शोधाशोध सुरू व्हायची. शेवटी शिक्षक असलेल्या गुरुराज जोशींच्या या स्वरध्यास घेतलेल्या मुलाचा पत्ता कोणाला तरी लागायचा. मुलाचं स्वरवेड जोशी मास्तरांच्या वेळीच लक्षात आलं. भीमण्णा कुर्तकोटीच्या चन्नाप्पांकडे शास्त्र्ााrय गाणं शिकू लागले, परंतु ग्रामोफोनवर वाजणारी ‘पिया बिन नहीं आवत चैन’ ही अब्दुल करीमखां याची ठुमरी ऐकून त्यांनाही (गंगूबाईंना वाटलं होतं तसंच) हिंदुस्थानी शास्त्र्ााrय संगीत आत्मसात करावं असं वाटू लागलं. त्याच काळात त्यांनी सवाई गंधर्वांचंही गाणं ऐकलं. 1930 च्या दशकातला हा काळ. भीमण्णा दहा-बारा वर्षांचे होते, परंतु गाण्याची ओढ एवढी की, त्यांनी त्यासाठी घर सोडलं. मग गानसाधनेसाठी भ्रमंती सुरू झाली. विजापूर ते पुणे, तिथून थेट ग्वाल्हेर गाठून तिथल्या म्युझिक स्कूलमध्ये संगीत शिकण्याचं ठरवलं. नंतर दिल्ली, लखनौ, रामपूर, कोलकाता असाही प्रवास झाला. प्रत्येक ठिकाणी संगीतातील स्वररत्नं त्यांनी कंठस्थ केली. शेवटी मुलाचा शोध घेणाऱया जोशी मास्तरांना त्यांचा ठावठिकाणा जालंदर येथे सापडला. त्यांनी भीमण्णांना घरी आणलं. 1936 पासून सवाई गंधर्वांकडे रीतसर शिक्षण सुरू झालं. 1941 मध्ये पहिलं गाणं झालं. 1942 च्या काळात मराठी, हिंदी भक्तिगीतंही गायली. 1943 मध्ये मुंबईला ते रेडिओवरचे कलाकार झाले. 1946 मध्ये गुरुजी सवाई गंधर्व यांच्या साठीच्या समारंभात गायिलेल्या भीमसेन यांच्या गाण्याची खूप प्रशंसा झाली. अल्पावधीतच स्वरांवर कमालीचे प्रभुत्व मिळवलेल्या भीमसेन जोशी यांचं गाणं हिंदुस्थानभर पोहोचलं. नंतर ते पुण्याचे रहिवासी झाले ते अखेरपर्यंत. त्यांचं महाराष्ट्रातलं वास्तव्य, मराठीशी जुळलेलं अतूट नातं आणि मराठीत गायिलेली विविध प्रकारची गीतं लक्षात घेतली तर ते मराठी संस्कृतीशी किती एकरूप झाले हाते याची जाणीव होईल. पुण्यातच त्यांनी गुरुजी सवाई गंधर्व यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सवाई गंभर्व संगीत समारोहाचं आयोजन सुरू केलं. रमणबागेत होणाऱया या वार्षिक स्वरसोहळय़ात रसिकांची अलोट गर्दी व्हायची, त्या स्वरमंदिराचा कळस असायचा भीमसेन यांचं गाणं. याचा अनुभव आम्हीही अनेकदा घेतला आहे.
‘संतवाणी’ हा संत नामदेव, तुकोबांच्या अभंग गायनाचा भक्तिरसपूर्ण कार्यक्रम महाराष्ट्रभर आणि देश-विदेशातही गाजला. अणुरणीया थोकडा, जे का रंजले गांजले, तीर्थ विठ्ठल, माझे माहेर पंढरी, ज्ञानियांचा राजा असे कितीतरी अभंग आपल्या मनात रुंजी घालतात. आपण ते सहज गुणगुणतो अशा सोप्या चालीत. याशिवाय भीमसेन यांनी ‘गुळाचा गणपती’ या ‘सब कुछ पुल’ असलेल्या चित्रपटासाठी गायिलेलं ‘इंद्रायणी काठी देवाची आळंदी’ हा अभंग गायला आणि तो सर्वतोमुखी झाला. ‘स्वयंवर झाले सीतेचे’ या सिनेमात गदिमांचं ‘रम्य ही स्वर्गाहून लंका’ हे गाणं आहे. वसंत देसाई यांनी हिंदोल रागात त्याची अप्रतिम चाल बांधली आणि भीमसेनजींच्या स्वरांनी त्यांना न्याय दिला. ‘देवकीनंदन गोपाला’ चित्रपटातील अखेरच्या दृष्यामधलं गदिमांचं ‘विठ्ठलाच्या पायी थरारली वीट’ हे गीत भीमसेन यांनी उत्कटतेने साकारलं.
श्रीनिवास खळे यांनी तर स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर आणि भीमसेन जोशी या पुढे ‘भारतरत्न’ झालेल्या दिव्य स्वरांना एकत्रितपणे काही गाणी दिली. ‘राम का गुणगान करिये’ हे गीत आठवा आणि त्यातले दोन्ही गगनाला गवसणी घालणारे स्वरही. विशेष म्हणजे राम फाटक यांनी संगीत दिलेलं, सुधीर मोघे यांचं ‘सखी मंद झाल्या तारका’ हे गाणं पंडित भीमसेन जोशी यांनीही गायलेलं आहे. नंतर सुधीर फडके यांच्या स्वरातील हे गीत जास्त प्रसिद्ध झालं. जगभर हिंदुस्थानी शास्त्र्ााrय संगीताची ध्वजा उंचावत ठेवणाऱया पंडितजींनी वर्षानुवर्षे गानसेवा केली. अशोक पत्की यांनी संगीत दिलेलं ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ हे देशभक्तिपर गीत भीमसेन यांच्याच स्वरांनी सुरू होतं आणि लतादीदींच्या स्वरात संपतं. नाद मराठीमध्ये अमराठी गायकांची मराठी गाणी देण्याचा प्रयत्न आहे. भीमसेन जन्माने कर्नाटकातले म्हणून जरी त्यांचा यात समावेश केला तरी भीमण्णांना ‘अमराठी’ कसं म्हणायचं? हा प्रश्नच आहे. खरं तर त्यांच्यासारखे ‘स्वरभास्कर’ वैश्विक असतात. त्यांना कुठल्या मर्यादा?





























































