
लोणावळ्यातील नागफणी पॉईंट येथील घनदाट जंगलात 24 वर्षीय तरुण बेपत्ता झाला आहे. फरान सेराजुद्दीन असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव असून तो मूळचा दिल्लीचा आहे. आपण रस्ता चुकल्याचे लक्षात येताच त्याने त्याबाबतची माहिती आई-वडिलांना फोन करून दिली होती.
फरान सेराजुद्दीन हा काही कामनिमित्त शुक्रवारी पुण्यात आला होता. तेथून तो एकटाच लोणावळा येथील नागफणी पॉईंट परिसरात फिरण्यासाठी गेला होता होता. मात्र जाताना ज्या रस्त्याने गेला तो रस्ताच फरान विसरला. या परिस्थितीतही त्याने आपण रस्ता चुकल्याचे कुटुंबीयांना कळवले होते असे लोणावळा शहर पोलिसांनी स्पष्ट केले आहे. फरान एका रोबोट कंपनीत अभियंता म्हणून कर्यरत असून तो शुक्रवारी पुण्याला आला होता. गेल्या तीन दिवसांपासून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तसेच फरान अचानक बेपत्ता झाल्याने त्याला शोधणाऱयास कुटुंबीयांनी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. फरानच्या शोधासाठी लोणावळ शहर पोलिसांबरोबरच कुकडी गावचे ग्रामस्थ, डॉग स्कॉड, एटीएस स्टाफ, ड्रोन कॅमेऱयाची मदत घेतली जात आहे.
























































