चार रॅन्चोंची कमाल, वाफेवरच्या फ्लेवर्ड चहाचा हटके स्टॉल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> भाग्यश्री कुलकर्णी

वेळ कोणतीही असू द्या, आम्हाला चहा हवाच, इतकं चहावर प्रेम करणारी मंडळी सर्वच वयोगटात आहेत. नाशिकच्या गंगापूर रोडवरील केबीटी सर्कलजवळ ‘हट’के असा ‘हट टी’ फ्लेवर्ड कुल्हड चाय अल्पावधीतच नाशिककरांच्या पसंतीस उतरलाय, तो त्याच्या आगळ्यावेगळ्या वैशिष्टय़ामुळे. कुल्हडमध्ये दिला जाणारा हा चहा बटरस्कॉच, मँगो, चॉकलेट, रोझ अशा दहा वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये मिळतो. कुकरच्या वाफेवर उकळलेल्या या चहाचा आस्वाद घेण्याची मजाच वेगळी. वाढता प्रतिसाद पाहता भविष्यात मोठा कॅफे सुरू करण्याचे स्वप्न या चार रॅन्चोंचा हा जुगाड नक्कीच सत्यात उतरवेल.

नाशिक येथील शेतकरी कुटुंबातील अश्विनी मोराडे हिला फूड इंडस्ट्रीची आवड आहे. पुण्यात इलेक्ट्रॉनिक्स ऍण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग करताना तिने मैत्रिणीसोबत नोव्हेंबर 2018 मध्ये वडगाव शेरी भागात संध्याकाळचे नाश्ता सेंटर सुरू केले. कमी वेळेत तयार होणाऱया पदार्थांसोबतच चॉकलेट, रोझ, बासुंदी अशा फ्लेवरचा चहाही त्या देऊ लागल्या. तरुणाईने त्याला उत्तम प्रतिसाद दिला. पुढे कोरोना काळात सेंटरच बंद करावे लागले. मात्र, अश्विनी स्वस्थ बसली नाही. तिने इंजिनिअरिंगला सोबत शिकणाऱया गौरव कमाणकर, प्रवीण बोराडे व खुशाल चौधरी यांच्या मदतीने कमी वेळेत होणारे पदार्थ द्यायचे या उद्देशाने कमी भांडवलात, विजेच्या अत्यल्प वापरातून ऑक्टोबर 2021 ला नाशिकमध्ये ‘हट टी’चा श्रीगणेशा केला. महागडय़ा एक्सप्रेसो मशीनला पर्याय म्हणून खुशाल याने युक्ती लढवली. कुकरमधील पाण्याची वाफ शिटीच्या जागी तांब्याच्या पाईपच्या मदतीने उपयोगात आणली. स्वतंत्र भांडय़ात नैसर्गिक घटकांपासून तयार केलेली फ्लेवर्ड चहा पावडर, इतर साहित्य मिसळून कुकरच्या वाफेवर चहा उकळवण्यास सुरुवात केली अन् बघता-बघता येथील चॉकलेट, पान, स्ट्रॉबेरी, मँगो अशा दहा स्वादांचा चहा लोकप्रिय झाला. आपल्या कामात पर्यावरणाला प्राधान्य हवेच म्हणून ते चहा कुल्हडमध्येच देतात. कॉफीप्रेमींसाठी वेगवेगळ्या स्वादाची कॉफी तसेच कोल्ड्रींक प्रकारातही त्यांनी वेगवेगळे प्रयोग यशस्वी केले आहेत. तिघा तरुणांसोबत अश्विनीही बारा-बारा तास स्टॉलवर चहा तयार करते. भांडवल नाही म्हणून या चौघांचं पाऊल मागे पडलं नाही. ‘कप ऑफ टी अ डे, कीप बॅड मूड अवे’ म्हणत त्यांनी प्रसंगी तोटाही सहन केला. ते आज या क्षेत्रात मोठय़ा मेहनतीने पाय रोवून उभे आहेत.