टार्गेट किलिंगसाठी 200 जणांची यादी तयार, पाकव्याप्त कश्मिरात रचला गेला कट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कश्मीरमध्ये कश्मिरी पंडितांवर आणि बाहेरून येऊन स्थायिक झालेल्या लोकांवर जीवघेणे हल्ले होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून या हल्ल्यात वाढ झाली आहे. या संदर्भात एक मोठा खुलासा झाला असून त्यात या टार्गेट किलिंगचा कट गेल्या वर्षी पाकव्याप्त कश्मिरात रचला गेल्याची माहिती मिळत आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, कश्मीरमध्ये टार्गेट किलिंगचा कट गेल्या वर्षी पाकव्याप्त कश्मिरातील मुजफ्फराबाद येथे रचला गेला होता. 21 सप्टेंबर 2021मध्ये मुजफ्फराबाद येथे आयएसआय अधिकारी आणि वेगवेगळ्या संघटनांचे दहशतवादी यांची एक गुप्त बैठक पार पडली.

या बैठकीत वेगवेगळ्या नावांनी आणि वेगवेगळ्या गटांच्या दहशतवादी संघटना बनवण्यात येतील, जे टार्गेट किलिंगची जबाबदारी पार पाडतील, असा निर्णय घेण्यात आला. या टार्गेट किलिंगच्या निशाण्यावर कश्मिरी पंडित, सिक्युरिटी पर्सनल, संघ आणि भाजपचे स्थानिक नेते, केंद्र सरकारचे कर्मचारी असतील असा कट रचण्यात आला.

तसंच आयएसआयने या संघटनांच्या सोबतीने 200 जणांची यादी तयारी केली होती. या 200 जणांना निशाणा बनवण्यात येणार होतं. आता वर्षभराने कश्मीरमध्ये अशा हत्याकांडांना सुरुवात करण्यात आली आहे.

गेल्या 26 दिवसांत 10 जणांची हत्या करण्यात आली आहे. यात शिक्षिका, बँक मॅनेजर इत्यादींचा समावेश आहे. काल दोन दहशतवादी हल्लेही झाले. त्याखेरीज दोन प्रवासी मजुरांवर गोळीबार करण्यात आला.