
आम्ही आधुनिकतेने आहार आणि विहार करण्यामध्ये फार कमी कालावधीमध्ये अव्वल स्थानी पोचलो आहे. दररोज खाण्यात फास्ट फूड, अति तेलकट आणि फ्रीजमधील पदार्थ सेवन करणे आणि मद्य, शीत पेय किंवा कृत्रिम पेयाचा, पिण्यात अतिरेक करणे म्हणजेच आम्ही अति आधुनिक आहोत असे समजणे हे समीकरण झाले आहे. याचा सर्वात आधी जर कोणता दुष्परिणाम होत असेल तर तो म्हणजे किडनी निकामी होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणे. अधिक कृत्रिम अन्न आणि कृत्रिम पेयाच्या वापरामुळे हळूहळू किडनी निकामी होत आहे, असे कळूनसुद्धा खाण्यापिण्याच्या व्यसनाला अव्याहतपणे सुरू ठेवणे, यात श्रीमंतांना मज्जा येते की काय? असे वाटायला लागले आहे. किडनी निकामी झाली तर किडनी ट्रान्सप्लांट करू! ही किडनी कुठून मिळणार? तर आहेत आपल्या देशात मोठय़ा प्रमाणात गरीब नागरिक! काही रुपयांसाठी कुणीही दोन पैकी एक किडनी विकायला सहज तयार होतो. हे सत्य इतके भयानक आहे की आज देशातील अनेक महानगरांमध्ये किडनी मिळवून देणारे दलाल फिरत आहेत.
अवयवदान हा इतका मोठा आणि व्यापक विषय असताना, वैद्यक कायद्याच्या चौकटीचा धुराळा उडवत किडनी रॅकेट राजरोसपणे आणि अवैध पद्धतीने आजही सुरूच आहे. देशातील गरीब जनतेच्या किडन्या रुपयांच्या भरवशावर सहज विकत घेता येऊ शकतात, हा आत्मविश्वास त्यांना येतो तरी कुठून हा एक मोठा सवाल आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले नाव ‘किडनी बाजार’ असे झाले म्हणूनच तर परकीय गोऱ्या अंगाची माणसे हिंदुस्थानकडे अवयव लावून घेण्यासाठी धाव घेताना दिसतात.
‘श्रीमंताच्या व्यसनाचा भार गरीबांच्या अवयवांवर’ हे वास्तव समोर आले आहे. मानवी जीवन वाचवण्यासाठी अवयव दान करणे हे एक महापुण्य कार्य आहे. यात शंकाच नाही. याच पुण्य कार्याचा गुणगौरव करून अवयव दानाचा सोहळा थोडयाशा रुपयांच्या नोटा सरकवून केला जातो आहे. हे सर्व थांबले पाहिजे, असे वाटते. म्हणून हिंदुस्थानी नागरिकांनी पूर्ण हिंदुस्थानी पद्धतीचा आहार आणि विहार घ्यावा. आपल्या सर्व हिंदुस्थानी पद्धतीच्या सणांमधून शरीराला आवश्यक असणारे खाद्य पदार्थ असतात. ऋतू चर्या आणि मानवी प्रकृती याचा पूर्ण विचार करूनच हिंदुस्थानी दिनचर्या ठरलेली आहे. आणि ही दिनचर्या कुणाचेही कोणतेही अवयव निकामी होऊ देत नाही.
डॉ. हर्षवर्धन कांबळे


























































