रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीच्या गळ्याचा चावा घेऊन विनयभंग, कोंढव्यातील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्लास संपल्यानंतर घरी जाणाऱ्या मुलीचा रिक्षाचालकाने गळ्याचा चावा घेऊन विनयभंग केल्याची धक्कादायक घटना 4 जूनला रात्री साडेआठच्या सुमारास कोंढव्यातील टिळेकरनगर ते इस्कॉन मंदीरानजीक रस्त्यावर घडली. घटनेमुळे पालकांसह मुलीच्या मनामध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जादा क्लास संपल्यानंतर 17 वर्षीय मुलगी 4 जूनला रात्री सव्वा आठच्या सुमारास रिक्षाने घरी निघाली होती. त्यावेळी चालकाने अंधाराचा फायदा घेउन टिळेकरनगर ते इस्कॉन मंदीरानजीक रस्त्यावर रिक्षा थांबविली. मुलीला मिठी मारून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला असता, तिने प्रतिकार केला. मात्र, रिक्षाचालकाने तिच्या गळ्याचा चावा घेतला. तिचा हात पकडून विनयभंग केला. मुलीने आरडाओरड केल्यानंतर रिक्षाचालक फरार झाला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपीचा शोध घेत आहेत.

मुलींच्या प्रवासाची खबरदारी घ्या

रिक्षाचालकांकडून मुलींचा विनयभंग केल्याच्या अनेक घटना यापूर्वीही घडल्या आहेत. त्यामुळे पालकांनी मुलींच्या प्रवासाबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. विशेषतः शाळा, महाविद्यालयासह क्लाससाठी ने-आण करताना ओळखीतील रिक्षाचालकाची नेमणूक करावी. संबंधित रिक्षाचालकाचे परमीट, चारित्र्य पडताळणी, आरटीओ रजिस्ट्रेशन, फिटनेस असल्याचीही खात्री करावी. त्यामुळे अशा घटना टाळण्यास मदत होणार आहे.