
बारावीच्या परीक्षेत यश मिळविणाऱ्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी, उज्वल भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
आयुष्यात परीक्षेतील यशाला महत्व असतेच. परीक्षा भविष्यात येणाऱ्या आव्हानांची तयारी करून घेते. त्यामुळे बारावीच्या परीक्षेत यश मिळविणाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. यानंतर सुरु होणाऱ्या शैक्षणिक वाटचालीसाठी आणि आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये भविष्य घडवण्यासाठी हार्दिक शुभेच्छा. या वाटचालीतून तुम्हाला आपल्या कुटुंबियांसह, समाज आणि देशाचे भविष्य उज्वल करण्याची संधी मिळणार आहे, या संधीचे आपण सोने कराल, हा विश्वास आहे. काहींना या टप्प्यावर यशाने थोडक्यात हुलकावणी दिली असेल, अशांनीही खचून न जाता पुन्हा एक संधी म्हणून नव्या जोमाने तयारी केल्यास, यश तुमचेच असेल. त्यासाठीही शुभेच्छा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाले.
उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
बारावीची परीक्षा हा शैक्षणिक जीवनातील एक टप्पा असून अंतिम साध्य नाही, त्यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थी व पालकांनी निराश न होता, खचून न जाता पुन्हा प्रयत्न करावेत. शिक्षणाच्या बरोबरीनं कला, क्रीडा, तांत्रिक कौशल्य विकसित करुन जीवनात यशस्वी होण्याचा प्रयत्न करावा. बारावीनंतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक कारकिर्द ठरवण्याचा, भविष्यातील वाटचाल ठरवण्याचा निर्णय घ्यायचा असतो. विद्यार्थ्यांची आवड, कल लक्षात घेऊन हा निर्णय विद्यार्थी व पालकांनी मिळून घ्यावा. राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं मनःपूर्वक अभिनंदन! सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक कारकिर्दीसाठी शुभेच्छा, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या संदेशात म्हटले.
यंदा राज्याचा बारावीचा निकाल 94.22 टक्के, कोकण विभागाची बाजी



























































