यंदा राज्याचा बारावीचा निकाल 94.22 टक्के, कोकण विभागाची बाजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

राज्याचा बारावीचा निकाल यंदा 94.22 टक्के एवढा लागला आहे. बारावीच्या निकालात कोकण विभाग सर्वात अव्वल राहिला आहे. कोकण विभागाचा 97.21 टक्के इतका निकाल लागला. दुपारी 1 वाजल्यापासून संकेस्थळावर विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे. निकाल जाहीर करण्यापूर्वी शिक्षण विभागाने पत्रकार परिषद आयोजित केली होती.

येवेळी सांगण्यात आले की यंदाच्या 12 विच्या परीक्षेचे नियोजन नेहमीपेक्षा 15 दिवस उशिराने करण्यात आले होते. यंदा 75 टक्के अभ्यासक्रमावर लेखी परीक्षा घेतली तर 40 टक्के अभ्यासक्रमावर प्रात्यक्षिक परीक्षा घेतली. त्यासोबतच तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन, प्रात्यक्षिक परीक्षा यासाठी 2 कालावधी देण्यात आले होते. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 70 ते 100 गुणांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे वाढीव वेळ देण्यात आला होता. तर 40 ते 60 गुणांच्या परीक्षेसाठी 15 मिनटे वाढीव वेळ देण्यात आला. परीक्षेआधी सर्व घटकांना विविध सूचना दिल्या होत्या. शाळा तिथे परीक्षा केंद्र देण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांची परीक्षा चांगल्या मानसिकतेत पार पडली गेली.

विज्ञान शाखेसाठी मराठी, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी या चार भाषांमधुन प्रश्नपत्रिका होत्या. मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी, गुजराती आणि कन्नड या भाषांमधून इतर विषयांसाठी प्रश्नपत्रिका होत्या. तसेच यंदा गैरमार्ग प्रतिबंधक योजना देखील रोवण्यात आली होती. शाळा तिथे केंद्र असल्यामुळे केंद्रांवर अधिकाऱ्यांची उपस्थिती जास्त होती.