
गुजरातमधील 24 वर्षीय क्षमा बिंदूने मोठय़ा धूमधडाक्यात बुधवारी स्वतःशीच लग्न केले. खरे तर क्षमाने 11 जून रोजी स्वतःशीच सात फेरे घेणार असल्याची घोषणा केली होती, परंतु वादविवादापासून वाचण्यासाठी तिने तीन दिवस आधीच विवाह केला. वधूच्या पेहरावातील क्षमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
काही दिवसांपूर्वी क्षमाने स्वतःशी लग्न करण्याचा म्हणजेच ‘सोलोगॅमी’चा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार बडोदा येथील गोत्री येथे क्षमाने पारंपरिक पद्धतीने विवाह केला. लग्नात नवरदेव, पंडित नव्हते. क्षमाच्या जवळच्या मित्रमंडळींनी लग्नसोहळय़ाला हजेरी लावली. लग्नाआधी हळदी, मेहंदी सोहळाही पार पडला. सुरुवातीला तिने मंदिरात लग्न करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र विरोध पाहता तिने घरीच लग्न केले.





















































