
>> दुर्गेश आखाडे
मी जसा दिसतो, माझी जी व्यक्तिरेखा आहे, त्या व्यक्तिरेखेप्रमाणे मला कामे मिळत गेली. विनोदी पद्धतीची माझी वेगळी शैली मला उपयोगी पडली. त्यामुळेच मला हिंदी चित्रपटांतही भूमिका मिळू लागल्या. मराठीत एक आपलेपणा आहे. आमच्या पिढीचे कलाकार तो आपलेपणा जपून आहोत. अभिनयाबरोबरच मी चित्रपट निर्मितीकडे वळलो. चित्रपट निर्मिती मला बरंच काही शिकवून गेल्याचे अनुभव सांगत आहेत गेली 38 वर्षे मराठी रंगभूमी, चित्रपटभूमी गाजविणारे विनोदी अभिनेते विजय पाटकर…
आपण ज्येष्ठ अभिनेते आहात. पूर्वीचा काळ आणि सध्याचा काळ यामध्ये आपल्याला काय बदल आढळून येतो?
– मी एकांकिका स्पर्धा, हौशी रंगभूमी, मग पुढे व्यावसायिक नाटकांत काम केले. त्यानंतर चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. मग दूरचित्रवाणी मालिका, मराठी चित्रपटांपाठोपाठ मी हिंदी चित्रपटांतही काम करू लागलो. पुढे मग जाहिरातींमध्येही मी काम करतोय. असा माझा 38 वर्षांचा प्रवास आहे. मी म्हणणार नाही, तो काळ वाईट होता. उलट आमचा सुरुवातीचा काळ खूप सुवर्णकाळ होता. कारण त्या काळात अभिनय करत असताना निरागसता होती. आम्ही काम करत असताना एकत्र राहायचो. अलीकडच्या काळात या क्षेत्रात व्यावसायिकता खूप आली आहे. आमच्या पिढीचे जे कलाकार आहेत ते आम्ही अजूनही एकत्र असतो.चित्रीकरण संपलं की, आम्ही भेटतो, चहाला जातो.गप्पा मारतो. पूर्वीच्या काळाशी सध्याची तुलनाही करता येणार नाही. कारण सर्व ग्लोबल झाले आहे. जुन्या काळातील लोक जसे हुशार होते, त्यांच्यामध्ये गुणवत्ता होती, जसे अभिनयसंपन्न होते, तशी गुणवत्ता आताच्या पिढीतही आहे. आजचे जे विषय आहेत,आजचा जो सिनेमा आहे किंवा नाटक आहे, त्याकरिता लागणारे दिग्दर्शन, नेपथ्य किंवा प्रकाश योजना उत्तमरीत्या करण्याची गुणवत्ता आजच्या पिढीतही आहे. आम्ही आमच्या कोकण चित्रपट महोत्सवात जे चित्रपट निवडले, ते चित्रपट करणारी सर्व तरुण मुले आहेत. एकापेक्षा एक जबरदस्त चित्रपटांची निर्मिती या तरुण पिढीने केली आहे. मला इंडस्ट्रीत 38 वर्षे झाली.1979 पासून हौशी रंगभूमी ते 2022 व्यावसायिक नट अशी माझी वाटचाल आहे.
हिंदी चित्रपटांतही आपण काम केलेत तो अनुभव कसा होता ?
– ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन,अजय देवगण,संजय दत्त,रणवीर सिंग,इरफान खान,बोमन इराणी,अर्शद वारसी,जावेद जाफरी या सर्व दिग्गज मंडळींसोबत मी काम केले आहे. हिंदीत काम केल्याचा मला चांगला अनुभव आहे. फक्त हिंदीत व्यावसायिकता खूप असल्याने तिकडे कामाशी काम असते. मी काम केलेल्या हिंदीतील सर्वच कलाकारांसोबत माझे चांगले संबंध आहेत. तिथे व्यावसायिकपणा जास्त असतो. हिंदी चित्रपटसृष्टी खूप चांगली आहे हे मी माझ्या अनुभवावरून नक्कीच सांगेन.
विनोदी अभिनयामुळेच तुम्हाला हिंदी चित्रपटात संधी मिळाली का ?
– हो! बरोबर आहे. मला विनोदी अभिनयामुळेच हिंदी चित्रपटांत कामे मिळाली. कारण मी जो नट आहे, माझी जी व्यक्तिरेखा आहे, त्याला अभिप्रेत मी अभिनय करतो. बच्चन साहेबांचे काम मी करू शकत नाही किंवा अजय देवगणचे सिंघमचे काम मी करू शकत नाही. विनोदी पद्धतीची वेगळी माझी शैली असल्यामुळे मला तशा प्रकारच्या भूमिका मिळाल्या. माझा पहिला हिंदी चित्रपट ‘तेजाब’. 1986चा चित्रपट आहे. तेव्हापासून मी हिंदीत काम करतोय. मी हिंदीत साधारण पन्नास चित्रपट केले, तर मराठीत साडेतीनशे चित्रपट केले आहेत, पण विजय पाटकर काहीतरी वेगळं करतोय अशी माझी नोंद झाली. माझ्यातला वेगळेपणा मी जाणवून दिला म्हणून मला कामे मिळतं गेली आणि अजूनही कामे करतोय.आता रोहित शेट्टीचा ‘सर्कस’ चित्रपट येतोय. त्यामध्ये मी आहे.
सध्या काही चित्रपट सुपरहिट होत आहेत, त्याविषयी तुम्हाला काय वाटते?
– सध्या मराठी आणि दाक्षिणात्य चित्रपट गाजत आहेत. गेल्या काही दिवसांत या चित्रपटांना यश मिळाले आहे.मराठी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमुळे हिंदी चित्रपटसृष्टीचे डोळे उघडले आहेत.त्यांना आता कळून चुकले आहे की, चांगले काम केले तरच चित्रपट चालणार.कारण हिंदीतला एकही वाह्यात चित्रपट चालेला नाही.आताच्या काळात फक्त मराठी आणि दाक्षिणात्य चित्रपट चालले आहेत. पूर्वी तमाशाप्रधाननंतर विनोदप्रधान चित्रपट होते. आता मात्र चित्रपटांचे विषय बदलले आहेत. विनोदी चित्रपटांबरोबरच सामाजिक चित्रपटही येत आहेत.
अभिनयाबरोबरच कालांतराने आपण चित्रपट निर्मितीकडे वळलात.चित्रपट निर्मितीचा प्रपंच कसा सांभाळलात?
– 2005 साली मी चित्रपट निर्मितीकडे वळलो.तेव्हा ‘मी एक उनाड दिवस’ हा चित्रपट केला होता.त्यानंतर मी ‘चष्मेबहाद्दर’,‘लावू का लाथ’ या चित्रपटांची निर्मिती केली.निर्मितीबरोबर दिग्दर्शनही केले होते.चित्रपट निर्मिती मला खूप चांगला अनुभव देऊन गेली. चित्रपट करणं सोपं आहे, पण तो विकणं किंवा रिलीज करणे फार कठीण आहे.म्हणजे माझा 38 वर्षांचा अनुभवही कमी पडला.तुम्ही जर चित्रपट निर्मिती केलीत तर त्या चित्रपटाचे पुढे काय करायचे, तो चित्रपट कसा विकायचा, हे तुमच्यातील ज्येष्ठ मंडळींना विचारा.त्यांच्या अनुभवातून शिकून घ्या काय करायचे ते आणि मगच चित्रपट करा, चित्रपट निर्मिती करताना मी एक चूक केली.मी माझ्या वरिष्ठ मित्रांना विचारले नाही.मी पैसे टाकले आणि थेट चित्रपट केला आणि त्यानंतर मला थोडा फटका बसला.‘एक उनाड दिवस’, ‘चष्मेबहाद्दर’ हे चित्रपट आजही लोक पाहतात.‘
कोकण चित्रपट महोत्सव करण्यामागे तुमचे उद्दिष्ट काय होते?
– आम्ही मुंबईतील काही कलाकारांनी एकत्र येऊन ‘सिंधुरत्न कलावंत’ ही संस्था स्थापन केली आहे. या संस्थेत माझ्याबरोबर अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये,विजय राणे,छाया कदम,प्रमोद मोहिते,अमीर हडकर,प्रकाश जाधव,यश सुर्वे ही मंडळी आहेत.आम्ही यंदा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यांत पहिला कोकण चित्रपट महोत्सव आयोजित करण्याचा प्रयत्न केला.आमच्या टीमने 14 दर्जेदार मराठी चित्रपटांची निवड या महोत्सवासाठी केली होती.माझी 38 वर्षांची अनुभवाची जी पुंजी आहे, ती माझ्या कलाकार मित्रांच्या कामी यायला हवी म्हणूनच आम्ही हा कोकण चित्रपट महोत्सव आयोजित केला.या महोत्सवातून दर्जेदार चित्रपट रसिकांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.हा महोत्सव पाहून स्थानिक कलाकारांतून चांगले कलाकार निर्माण व्हावेत, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा हा उद्देश आहे. तसेच आम्ही स्थानिक कलाकारांच्या कलेलाही या महोत्सवात संधी दिली.





























































