5G येणार! स्पेक्ट्रमचा लिलाव; केंद्राची मंजुरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात 5 जी इंटरनेट सेवा येणार असून, स्पेक्ट्रमच्या लिलावास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. सध्या देशात 4 जी (फोर जी) सेवा आहे. त्यापेक्षा 5 जी चा इंटरनेट स्पीड दहा पटीने जास्त असेल. या इंटरनेट स्पीडमुळे दूरसंचार क्षेत्रात अनेक बदल होतील.

दूरसंचार मंत्रालयाने दिलेल्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे स्पेक्ट्रम लिलावाचा मार्ग मोकळा झाला आहे. लिलावात यशस्वी बोली लावणाऱया कंपनीला 20 हफ्त्यांमध्ये रक्कम भरावी लागेल. पुढील महिन्यात जुलै अखेरपर्यंत स्पेक्ट्रम लिलाव होण्याची शक्यता आहे. 5 जी स्पेक्ट्रमला 72097.58 मेगाहट्स स्पेक्ट्रमसाठी 20 वर्षांच्या कालावधीकरिता लिलाव केला जाणार आहे असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. 5 जी सर्व्हिससाठी टेलिकॉम कंपन्यांकडून सातत्याने चाचण्याही सुरू झाल्या आहेत.

सुरुवात मेट्रोसिटी आणि मोठय़ा शहरांपासून

टेलिकॉम कंपन्यांकडून ‘5 जी’साठी इंन्फास्ट्रक्चर तयार केले जात आहे. त्यामुळे लवकर ही सेवा सुरू होईल असा अंदाज आहे. सुरूवातीला मेट्रो सिटी आणि मोठय़ा शहरांमध्ये या सेवेची सुरूवात होईल.

काय बदलणार

सध्या देशात टेलिकॉम कंपन्यांकडून 4 जी सेवा पुरविण्यात येते. 5 जी सेवा सुरू झाल्यास इंटरनेट स्पीडमध्ये तब्बल 10 पटीने वाढ होईल.
डाऊनलोड आणि अपलोडमध्ये खूप मोठा स्पीड मिळू शकेल.
ऑडिओ, व्हिडिओ कॉलिंगच्या क्वॉलिटीत सुधारणा होईल.
गेमिंग सेक्टरमध्ये बदल होतील.