
शिवडी येथील बीडीडी चाळींमधील असंख्य मराठी कुटुंबे पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. पण या चाळींच्या पुनर्विकासाला केंद्र सरकारने नकारघंटा वाजवली आहे. आमच्या खात्याच्या सध्याच्या धोरणात या चाळींच्या पुनर्विकासाची कोणतीही सक्षम तरतूद नाही, असे पत्र केंद्रीय बंदरे, जहाज वाहतूक व जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांना पाठवले आहे.
मुंबईतील वरळी, नायगाव व ना.म. जोशी मार्गावरील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्य सरकारने सुरू केला आहे. शिवडी येथील बीडीडी चाळी केंद्र सरकारच्या जागेवर आहेत. या चाळींच्या पुनर्विकासासाठी शिवसेना खासदार अरविंद सावंत पाठपुरावा करीत आहेत. त्यामुळे त्यांनी केंद्रीय बंदरे मंत्रालयाला पत्र पाठवून पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करण्याची मागणी केली आहे.
या पत्राला केंद्रीय बंदरे व जहाज वाहतूक मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी उत्तर पाठवले आहे. बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव आम्ही पडताळून पाहिला. पण या मंत्रालयाच्या सध्याच्या धोरणात ही तरतूद नाही. या धोरणाची माहिती आम्ही मुंबई बंदरे प्राधिकरणाला दिली असल्याचे या पत्रात नमूद केले आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देताना खासदार अरविंद सावंत म्हणाले की, या चाळींच्या पुनर्विकासासाठी मी गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करीत आहे; पण न्याय मिळत नाही. यापूर्वी केंद्राकडून आलेले पत्र सकारात्मक होते. पण आता एकदम नकारात्मक भूमिका घेतली आहे. आमचे धोरण नाही असे नमूद केले. त्यांनी सरळसरळ नकार दिला आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
पुनर्विकासासाठी धोरण करा
या उत्तरानंतर खासदार अरविंद सावंत यांनी सर्वानंद सोनोवाल यांना पुन्हा एक पत्र लिहिले आहे. या चाळींच्या पुनर्विकासाला सहकार्य करण्यासाठी तुमच्या कार्यालयामार्फत धोरण करावे. त्यातून शिवडी बीडीडी चाळकऱयांचे हक्क मिळण्यासाठी काही मार्ग निघेल. केंद्र सरकारचे कोणतेही धोरण नसल्यामुळे हे चाळकरी हक्काच्या घरांपासून वंचित राहिले आहेत, असे पत्रात नमदू केले आहे.
केंद्राची अडवणूक
मुंबईतील तीनही बीडीडी चाळींचा पुनर्विकास होत असताना शिवडीच्या बीडीडी चाळींतील रहिवाशांना पुनर्विकासापासून वंचित ठेवणे हा गुन्हा आहे. केंद्र याच बीपीटीच्या जमिनीवरून आणि समुद्रावरून ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाला मंजुरी देते, मग बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला विरोध का करता, असा सवाल अरविंद सावंत यांनी केला. एका बाजूला प्रधान मंत्री आवास योजना आखता आणि दुसऱया बाजूला पडझड झालेल्या घरांच्या जागी नवीन घरे बांधून देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत आहे त्याला साथ देण्याऐवजी अडवणूक करता हे केंद्राच्या धोरणात कसे बसते, अशी विचारणा त्यांनी केली.
























































