4G पेक्षा 5G प्लॅन्स 10 ते 40 टक्के महाग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्पेक्ट्रमच्या लिलावास केंद्र सरकारने मंजुरी दिल्यामुळे हिंदुस्थानात मार्च 2023 पासून 5 जी इंटरनेट सेवेला सुरुवात होणार आहे. 5 जीचा स्पीड हा सध्याच्या 4 जीच्या तुलनेत दहापटीने अधिक असणार आहे. 5 जीच्या मासिक प्लॅन्ससाठी किती पैसे मोजावे लागतील, याबाबत आतापासूनच सर्वसामान्यांमध्ये चर्चा रंगल्या आहेत. जगभरातील ट्रेंड पाहता हिंदुस्थानमध्ये 5 जी मासिक प्लॅन्ससाठी 4 जीच्या तुलनेत 10 ते 40 टक्के अधिक पैसे मोजावे लागू शकतात.

सर्वप्रथम डिसेंबर 2018 मध्ये 5 जी सेवा सुरू करणारे दक्षिण कोरिया हा जगातील पहिला देश ठरला होता. त्यानंतर 2019 मध्ये स्वित्झर्लंड, यूके, यूएसने 5 जी सेवा सुरू केली. आतापर्यंत 61 हून अधिक देशांमध्ये 5 जी सेवा कार्यरत आहे. सध्या ज्या देशांमध्ये ही सेवा सुरू आहे तेथील अनलिमिटेड मासिक प्लॅन्सवर नजर टाकल्यास टेलिकॉम कंपन्यांचे 5 जी प्लॅन्स 4 जी पेक्षा 10 ते 40 टक्के महाग आहेत. परंतु 1 जीबी 5 जी डेटाची किंमत 4 जी पेक्षा कमी असू शकते.

जगभरातील मासिक अमर्यादित प्लॅन्सचे दर

देश                       4 जी       5 जी
दक्षिण कोरिया           5278     5650
सनराईस (अमेरिका)    6245     6988
स्विसकॉम (स्वित्झर्लंड)  5353    10705
केटी (दक्षिण कोरिया)   2676     6469

दूरसंचार कंपन्यांनी अलीकडेच 20 ते 25 टक्के दरवाढ केली आहे. लवकरच त्यात आणखी वाढ होऊ शकते. 5जी च्या महागडय़ा स्पेक्ट्रमच्या खरेदीसाठी पैशांची गरज आणि कंपन्यांचे वाढलेले कर्ज हे त्याचे कारण आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई, पुणे, बंगळुरू, चेन्नई, चंदिगड, दिल्ली, लखनौ, गुरुग्राम, अहमदाबाद, जामनगर, कोलकाता, हैदराबाद, गांधीनगर या देशातील प्रमुख 13 शहरांमध्ये 5 जी इंटरनेट सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.