विशेष – मराठी विचारांचा अंगार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> आकाश दीपक महालपुरे

शिवसेना आणि शिवसेनेतील प्रत्येक शिवसैनिकासाठी 19 जून हा भाग्याचा दिवस मानला जातो. कारण याच दिवशी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी आणि अन्याय-अत्याचाराविरोधात लढण्यासाठी मराठी माणसाच्या गोकुळात शिवसेना नामक एका धगधगत्या वादळाचा जन्म झाला होता. 1966 ते 2021 या पाच दशकांच्या कालखंडात प्रचंड वादळे, वावटळी आल्या, पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना नामक तेजोमय सूर्याला कोणीच रोखू शकले नाही. कारण शिवसेनाप्रमुखांच्या उत्तुंग कर्तृत्वाची साक्षच गगनचुंबी होती. आजही शिवसेना तितक्याच तेजाने महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात तळपत आहे.

शिवसेनेचा वटवृक्ष गावागावांत बहरलेला आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक भागात त्याची पाळेमुळे घट्ट रोवली आहेत. उंचच उंच फांद्या दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहचल्या आहेत आणि म्हणूनच मराठी माणूस आज या जगाचा एक घटक बनला आहे.

शिवसेनाप्रमुखांनी शिवसेना उभारून मराठी माणसाला एक वारसा दिला आहे. शिवसेनाप्रमुखांचे 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण सदैव दर्शवत राहिले आहे. शिवसेनेने केलेली आंदोलने आणि संघर्ष सर्वांसमक्ष आणि सर्वश्रुत आहे. कारण महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना सदैव कटिबद्ध राहिलेली आहे. महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या रक्षणासाठी शिवसेनाच धावली आहे हे उघड आहे,

आम्ही महाराष्ट्रात मराठी आणि हिंदुस्थानात हिंदू आहोत या आपल्या विधानावर शिवसेनाप्रमुख सदैव ठाम राहिले आणि मग ‘गर्व से कहो हम हिंदू है’ या घोषणेला शिवसेनाप्रमुखांमुळेच खरा अर्थ प्राप्त झाला. शिवसेनेचा लढा जसा मराठी अस्मिता, महाराष्ट्राचा अभिमान, हिंदूचा स्वाभिमान यासाठी झाला त्यापेक्षा जनतेच्या जगण्या-मरण्याच्या प्रश्नांवर अधिक झाला. गावोगावी शिवसैनिक कसे तयार झाले, दसरा मेळाव्याला हजारो पावले वर्षानुवर्षे शिवतीर्थाकडे का वळतात, हे सारे कोडे वाटत असले तरी शिवसेनाप्रमुख आणि शिवसेना यांच्याप्रति असलेली कडवी निष्ठाच त्यामागील कारण आहे. जनसामान्यांची ही संघटना शिवसेनाप्रमुखांच्या मार्गदर्शनामुळे आणि शिवसैनिकांच्या निष्ठsमुळे सदैव खंबीरपणे उभी राहिली. जनमानसातील शिवसेनेचा प्रभाव, स्थान आणि प्रेम कधीही कमी झाले नाही. विशेषतः एक महत्त्वाची बाब म्हणजे, वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नेतृत्व हे प्रस्थापित तसेच सर्वच राजकीय नेत्यांपेक्षा वेगळे आणि मुख्य म्हणजे अत्यंत आक्रमक पद्धतीचे होते. मराठी माणूस बाळासाहेबांनी जोडला.

राजकारणात जमेची पकड बसवतानाच सर्व अडचणींमधून ‘सामना’ दैनिकासारखा व्याप अंगावर घ्यायचा म्हणजे हल्लीच्या काळात शिवधनुष्य पेलण्यासारखेच होते, परंतु हे रामाचे बळ केवळ जनता जनार्दनाने शिवसेनाप्रमुखांना दिले आणि त्या बळावरच महाराष्ट्र जिंकण्याचे कार्य शिवसेना करू शकली. महाराष्ट्र विधानसभेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवू शकली. पुढेही मराठी विचारांचा हा ‘अंगार’ धगधगताच राहणार आहे.