
मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात आज सकाळी एका चालत्या ट्रकने पेट घेतला. ट्रकमधील चालक आणि क्लिनरनी उडी मारुन आपला जीव वाचवला. आगीमुळे ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
चिपळूण येथून लोटे औद्योगिक वसाहतीकडे हा ट्रक निघाला होता. परशुराम घाटातील विसावा पॉइंट येथे पोहोचताच. ट्रकच्या इंजिनमधून अचानक धूर येऊ लागला. हा धूर पाहून चालक आणि क्लिनरने ट्रकमधून बाहेर उडी मारली. काही क्षणात ट्रकच्या पुढील भागाला आग लागली. या आगीत ट्रकची केबीन जळून खाक झाली. ट्रकला आग लागल्याची माहिती मिळताच चिपळूण येथील अग्नीशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. अग्नीशमन बंबाने आग नियंत्रणात आणली.


























































