देवनार पशुवधगृहात प्रथमच ऑनलाईन आरक्षण सुविधा; गर्दी टाळण्यासाठी पालिकेचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आशिया खंडातील सर्वांत मोठे पशुवधगृह असणारे मुंबई महापालिकेचे देवनार पशुवधगृह बकरी ईद सणानिमित्त सर्व सोयीसुविधांसह सज्ज झाले असून या वर्षीपासून पहिल्यांदा पशुवधासाठी ऑनलाईन आरक्षण करता येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, गर्दी टाळण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, बकरी ईद निमित्त रविवारी अतिरिक्त आयुक्त आशीष शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष आढावा बैठक घेण्यात आली.

बकरी ईद या सणानिमित्त महापालिकेच्या देवनार पशुवधगृहात जिवंत बकरे व म्हैसवर्गीय प्राण्यांच्या बाजाराला परवानगी दिली जाते. यंदा हा सण 10 जुलैला होणे अपेक्षित आहे. ते लक्षात घेता, पालिकेमार्फत देवनार पशुवधगृहात 29ला सकाळी 6 वाजेपासून बकर्‍यांना आणि 28 जूनपासून म्हैसवर्गीय प्राण्यांना देवनार पशुवधगृहात प्रवेश दिला जाणार आहे. दरम्यान, प्राण्यांसाठी तात्पुरते निवारे, 364 सीसीटीव्ही, प्राण्यांसाठी पाणी, चारा, प्राथमिक पशुवैद्यकीय आरोग्य केंद्रे, प्राथमिक उपचार केंद्रे, कोरोना तपासणी, रुग्णवाहिका, 350 पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून दिवस-रात्र सेवा देणारा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून 7304184636, 7304151636, 9167471686, 9167471839 असे नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक आहेत. बैठकीला महापालिका उपआयुक्त विश्वास शंकरवार, एम/पूर्व विभागाचे साहाय्यक आयुक्त महेंद्र उबाळे, देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक कलीमपाशा पठाण, पोलीस, अग्निशमन दल व वाहतूक पोलीस यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सर्वसामान्यांसाठी बंद
देवनार पशुवधगृह बकरी ईद कालावधीत सकाळी 6 ते 10 या कालावधीत नागरिकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे, त्यामुळे साफसफाई व परीक्षणात्मक कामे करता येणार आहेत. त्यामुळे या वेळात सर्वसामान्यांनी देवनार पशुवधगृहाला भेट देऊ नये व सहकार्य करावे तसेच लहान मुले, वयोवृद्धांना देवनार पशुवधगृहात आणू नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे.