बंडखोर आमदारांना लक्ष्मीदर्शन, आसाममधील पूरग्रस्त मात्र वाऱ्यावर; तृणमूल काँग्रेसची भाजपवर सडकून टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आसामनध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये महापूर आला आहे. आतापर्यंत पन्नासहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे तर लाखो नागरिक विस्थापित झाले आहेत. अशा परिस्थितीत शिवसेनेचे बंडखोर आमदार गुवाहटीतील रॅडिसन ब्यू हॉटेलमध्ये थांबले असून त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. या आमदारांची हॉटेलमध्ये खरेदी विक्री सुरू असल्याचा आरोप करत त्या विरोधात तृणमूल काँग्रेसने हॉटेलबाहेर निदर्शनं केली आहे.

”भाजप या हॉटेलमध्ये महाराष्ट्रातील आमदारांची खरेदी विक्री करत आहे. मात्र पूरग्र्स्तांना अद्याप एक पैसाही दिलेला नाही. आधी पूरग्रस्तांना मदत करा आणि हे प्रकार थांबवा”, अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे. या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

”आसाममध्ये महाभयंकर पूर आला आहे. अनेक लोकं यात मृत्युमुखी पडले आहे. आसाम व केंद्रातील भाजप सरकारने आतापर्यंत पूरग्रस्तांना एका पैशाचीही मदत केलेली नाही. ते सोडून बाजारात जशी वस्तूंची विक्री केली जाते तसं इथे या हॉटेलमध्ये आमदारांची विक्री सुरू आहे. हे सर्व बंद करा. हा पैसा आमच्या पूरग्रस्तांना द्या. महाराष्ट्राचा हा पॉलिटिकल ड्रामा महाराष्ट्रात करा. आमच्या पूरग्रस्तांना मदत करा.’, असे तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.