प्रासंगिक – अलौकिक दत्तावतारी संत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. शरयू जाखडी

आपल्या पवित्र हिंदुस्थान भूमीला परमेश्वरी वरदान असल्याने येथे महान ऋषीमुनी, संतमहात्मे जन्माला आले. आपल्या तपःसामर्थ्याने ध्यानातून त्यांनी विश्वाची व पारमार्थिक रहस्ये उलगडली आहेत. ती त्यांच्या ग्रंथांतून पुढील पिढीपर्यंत पोहोचली. अनेक पुण्यवान घराण्यांनी परमेश्वरी उपासना करून ज्ञानदानाचे क्रत चालू ठेवले. अशाच एका दत्तोपासक धार्मिक घरात श्रीवासुदेवानंद सरस्वती ऊर्फ टेंबेस्वामी या महान विभूतीचा जन्म झाला. आज या महान संन्यासी विभूतीची पुण्यतिथी. वासुदेवानंद सरस्वती ऊर्फ टेंबेस्वामी यांना दत्तावतार म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे. त्यांच्या ठिकाणी अलौकिक प्रतिभाशक्ती, दिव्य प्रज्ञाशक्ती आणि तल्लख बुद्धिमत्ता होती याची प्रचीती लहान वयातच आली. टेंबेस्वामी यांनी लहान वयातच संस्कृत भाषा तसेच संस्कृत व्याकरण यात पारंगतता प्राप्त केली. संस्कृतातील अमरकोश, शिक्षासप्तशती इत्यादी ग्रंथ त्यांनी मुखोद्गत केले. टेंबेस्वामींचे आजोबा हरभटदादा संस्कृतचे जाणकार होते. त्यांच्याकडून स्वामींना मार्गदर्शन मिळत असे. तसेच विष्णुशास्त्री पंडितांकडून त्यांनी वेद शिकून घेतले. वेदाध्ययन, नियमित स्नानसंध्या, आचारात स्वामींनी कधी चालढकल केली नाही. स्वामींचे आचरण अतिशय शुद्ध होते. ते रोज सकाळ-संध्याकाळी सूर्यासमोर उभे राहून भास्कराला अर्ध्य देत असत. या नित्यक्रमामुळे ते तेजस्वी दिसत. वासुदेवानंद स्वामी 11 वर्षांचे असताना त्यांचे आजोबा हरभटदादा निवर्तले. त्या घराला हरभटदादांचा मोठा आधार होता. अर्थातच सर्व प्रापंचिक जबाबदारी लहान वयातच वासुदेवानंदांच्या खांद्यावर आली. घरची एकंदर परिस्थिती फारशी समाधानकारक नव्हती तरीही वासुदेवांनी घर सांभाळण्याचा आटोकाट प्रयत्न केला. एक दिवस पूजा करताना त्यांना गुरू दत्तात्रेयांचा दृष्टांत झाला की, तू नरसोबाच्या वाडीला ये. त्याप्रमाणे आई रमाबाईंचा निरोप घेऊन त्यांनी नरसोबाच्या वाडीकडे प्रस्थान केले. श्री दत्तगुरूंचे प्रत्यक्ष दर्शन घेऊन काही दिवस तेथे राहून ते माणगावी परत आले. वयाच्या 21 व्या वर्षी वासुदेवानंदांचे लग्न अन्नपूर्णाबाई हिच्याशी झाले. 1891 मध्ये पत्नीसह तीर्थयात्रेला गेले असताना नाशिक क्षेत्री अन्नपूर्णाबाई अनंतात विलीन झाल्या. त्यांचे क्रियाकर्म करून वासुदेवानंदानी गोदावरीच्या तीरी संन्यास दीक्षा ग्रहण केली. नंतर उज्जैनच्या नारायणानंद सरस्वती यांनी त्यांना संन्याशांनी धारण करायचा ‘दंड’ दिला. संन्याशांच्या हातातील दंड हा विष्णुस्वरूप असून त्याला विष्णुलिंग संबोधले आहे. परंपरा व संस्कृतीचे ते प्रतीक आहे. मुळात ते कर्मयोगी. तथापि ज्ञानयोग, भक्तियोग व कर्मयोग यात ते पारंगत होते. शिष्याच्या योग्यतेनुसार योग्य मार्गाचा ज्ञानदीप त्याच्या हाती देत. वासुदेवानंद सरस्वती हे अलौकिक प्रतिभासंपन्न कवी होते. त्यांनी गंगाधर सरस्वती यांनी मराठीत लिहिलेल्या ‘गुरुचरित्रा’चे, हिंदुस्थानातील सर्व ज्ञानीजनांना कळावे म्हणून समश्लोकी संस्कृत भाषेत आणले. हे त्यांचे महान कार्य होय. त्यांनी अनेक ग्रंथांचे लेखन केले. ‘गुरुचरित्रा’तील नृसिंह सरस्वतीच्या अद्भुत चरित्राची ओळख हिंदुस्थानभर नेली. स्वतः नैष्ठक संन्यास धर्माचे पालन करीत असले तरी सामान्य भाविक जनांपासून ते विरक्त नव्हते. ‘ऐसी कळवळय़ाची जाती। करी लाभाविण प्रीती।’ अशा कुसुमकोमल अंतःकरणाचे. सामान्यांसाठी त्यांच्या दुःखनिवारणार्थ गरज पडल्यास वासुदेवानंद सिद्धींचा वापर करीत असत. आसेतुहिमाचल हिंदुस्थानवर प्रवास करून सर्व तीर्थक्षेत्रे त्यांनी पाहिली. या भ्रमंतीत त्यांनी स्वामी समर्थ, वऱहाडातील गुलाबराव महाराज, नाशिकचे देव मामलेदार वगैरे अनेक विभूतींच्या भेटी घेतल्या. वासुदेवानंदांचे भ्रमण हे अनवाणी राहून केलेले असे. मुखी ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ असे. वासुदेवानंद सरस्वती ऊर्फ टेंबेस्वामी महाराजांची, दत्तावतारी, कृपाळू, कनवाळू, भूतदयावादी संन्यासी सत्पुरुषाची अद्भुत अलौकिक अशी ही चिरस्मरणीय जीवनगाथा आहे.