
मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयात प्रलंबित असल्याने सरकारी नोकऱयांत नियुक्ती न मिळालेल्या समाजातील तरुणांसाठी अतिरिक्त पदे निर्माण करण्यात यावीत, अशी मागणी मराठा नेत्यांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली होती. यावरही योग्य निर्णय घेत नियुक्ती न मिळालेल्या एसईबीसी उमेदवारांकरिता अधिसंख्य पदे निर्माण करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
सर्वोच्च न्यायालयाच्या 2020 मध्ये झालेल्या निर्णयामुळे बाधित झालेल्या उमेदवारांना संरक्षण देण्यासाठी अधिसंख्य पदे निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याविषयीचे विधेयक विधानसभेत मांडण्यात येणार आहे. निवड झालेल्या परंतु मराठा आरक्षण रद्द झाल्याने नियुक्ती न मिळाल्याने बाधित झालेल्या एसईबीसी उमेदवारांकरिता अधिसंख्य पदे निर्माण करण्यासाठी विधेयक मांडण्याचा निर्णय आज घेण्यात आला.
विदर्भ, मराठवाडा, उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळे पुनर्गठीत करणार
राज्यातील विदर्भ विकास मंडळ, मराठवाडा विकास मंडळ व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ या तिन्ही प्रादेशिक विकास मंडळांचे पुनर्गठन करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ही मंडळे पुर्नगठीत करण्यासंदर्भातील विनंती केंद्र शासनाला करण्याबाबत राज्यपालांना शिफारस करण्यात येईल. सध्याच्या मंडळाचा कालावधी 30 एप्रिल 2020 रोजी संपुष्टात आला आहे.
नगर-बीड-परळी वैजनाथ रेल्वे मार्गाच्या सुधारित खर्चास मान्यता
नगर-बीड-परळी वैजनाथ या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या द्वितीय सुधारित खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यात राज्य शासनाचा आर्थिक हिस्सा देण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
नगर-बीड-परळी वैजनाथ या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या 4 हजार 805 कोटी 17 लाख रुपयांच्या सुधारित अंदाजपत्रकास आज बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच या प्रकल्पासाठीचा राज्य शासनाचा 2 हजार 402 कोटी 59 लाख रुपयांचा 50 टक्के इतका हिस्सा केंद्र शासनास निधीच्या उपलब्धतेनुसार टप्प्याटप्प्याने देण्यात येईल.
जमीन भोगवटादार रूपांतरण अधिसूचनेस दोन वर्षांची मुदतवाढ
वाणिज्यिक किंवा औद्योगिक जमिनीच्या भोगवटादार वर्ग-2 मधून वर्ग-1 मध्ये रूपांतरणाबाबतच्या अधिसूचनेस दोन वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयानुसार महाराष्ट्र जमीन महसूल (भोगवटादार वर्ग-2 आणि भाडेपट्टय़ाने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग-1 मध्ये रूपांतरीत करणे) नियम 2019 यामध्ये 11 सुधारणा करून भोगवटादार वर्ग-2 च्या जमिनीचे रूपांतर वर्ग-1 मध्ये करण्यासाठी सवलतीच्या दराने अधिमूल्याची रक्कम भरण्याच्या कालावधीस 7 मार्च 2022 पासून दोन वर्षांची मुदतवाढ मंजूर करण्याबाबतची प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
हिंगोलीत बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन केंद्र
राज्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच हिंगोली जिह्यात माननीय बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन्यास मान्यता देण्यात आली. राज्यात हळद संशोधन व प्रक्रिया धोरण निश्चित करण्यासाठी गठीत केलेल्या समितीने केलेल्या शिफारशींस तत्त्वतः मान्यता देण्यात आली. हिंगोली जिह्यामध्ये ‘माननीय बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र’ कंपनी कायद्यानुसार ना नफा तत्त्वावर एक स्वायत्त संस्था म्हणून स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली. या केंद्रासाठी 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
कर्जत येथे दिवाणी न्यायालय स्थापणार
नगर जिह्यातील कर्जत येथे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) न्यायालय स्थापन करण्यास आणि त्यासाठी आवश्यक पदनिर्मिती करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. सध्या कर्जत व जामखेड येथील प्रकरणे श्रीगोंदा न्यायालयाकडे सुरू असून कर्जत ते श्रीगोंदा हे अंतर 45 कि.मी. असून जामखेड ते श्रीगोंदा हे अंतर 90 कि.मी.आहे. त्यामुळे पक्षकारांची गैरसोय होते. या न्यायालयासाठी 16 नियमित आणि 3 बाह्य यंत्रणेद्धारे 19 पदे निर्माण करण्यात येतील. या न्यायालयाच्या स्थापनेसाठी एक कोटी 23 लाख इतका खर्च येईल.
ग्रामीण भागासाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना
राज्यातील ग्रामीण भागात विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गासाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबवण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्यातील ग्रामीण भागात 20 लाभार्थ्यांकरिता एक वसाहत निर्माण करण्यात येईल. प्रत्येक वसाहतीस अंदाजे 88.63 लाख खर्च येईल. या वसाहतींना सर्व नागरी सुविधा असतील. 10 कुटुंबांकरिता प्रति वसाहतीसाठी अंदाजे 44.31 लाख इतका खर्च अपेक्षित आहे. या आर्थिक वर्षात वसाहतीकरिता तसेच वैयक्तिक घरकुलांसाठी 30 कोटी रुपये इतका निधी लागेल.



























































