
>>मिलिंद देखणे
सोलापूरचे डॉक्टर मोहंमद आझम यांना नुकताच साहित्य अकादमीचा भाषा सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. हिंदी, उर्दू, फारसी यांसह विविध भाषांवर प्रभुत्व असलेले डॉक्टर मोहंमद आझम हे प्राध्यापक म्हणून नगरमध्ये कार्यरत राहिले. ‘सुफी तत्त्वज्ञान- स्वरूप व चिंतन’, ‘सुफी वाद आणि तुलनात्मक धर्मशास्त्र’ हा त्रिखंडात्मक तसेच ‘नमाज, रहस्य, तत्त्वज्ञान’ असे तीन ग्रंथ त्यांचे प्रकाशित झाले आहेत. 400 ते 500 वर्षांपूर्वी ‘कदमराव पदमराव’ हा आद्य काव्यग्रंथ कवी फकरुद्दीन निजामी बिदरी यांनी लिहिलेला आहे. प्रा.आझम यांनी भाषाशास्त्र, व्याकरणशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, राजकारण व भूगोल या दृष्टिकोनातून संशोधनात्मक अभ्यास करून मराठी व दखनी भाषेतील स्नेहसंबंधांवर प्रकाश टाकला आहे.
- भाषा सन्मान हा पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर भाषेबद्दल काय वाटते?
– प्रत्येकाला आपापल्या भाषेचा आदर असतो. मलाही माझ्या भाषेचा आदर आहे. अनेकांना विदेशी भाषा ही जवळची वाटते. त्याचा उपयोग नाही. माणूस ज्या प्रांतात राहतो, त्याला तेथील भाषा आली पाहिजे व त्याने त्या भाषेमधूनच शिक्षण घेतले पाहिजे. महाराष्ट्रात मराठी आहे, तर मराठी भाषेमधून शिक्षण घेतले पाहिजे. आजच्या काळात दहा-दहा फुटांवर भाषा बदलते. हा देश बहुभाषिक आहे. हिंदुस्थानमध्ये वेगवेगळ्या भाषांच्या अनुषंगाने गुण्यागोविंदाने लोक राहतात. भाषा ही अवस्था टिकवताना दिसून येत नाही. कारण एक भाषा दुसऱया भाषेविषयी असुया बाळगून असते. त्यामुळे आपली भाषा श्रेष्ठ व इतरांची कनिष्ठ असा दुजाभाव भाषिक समुदायांत निर्माण होतो. नेमक्या याच बिंदूपासून भाषिक विध्वंसास प्रारंभ होतो. याचे उदाहरण म्हणजे महाराष्ट्र व कर्नाटकचा सीमावाद. मराठी महाराष्ट्रातील लोकांना प्रिय वाटते तशी कर्नाटकातील लोकांना कन्नड प्रिय वाटते. भाषिक प्रेमात जर सुसंवाद असेल तर संवाद वाढतो, परिणामी एकोपा वृद्धिंगत होतो असे म्हणावे लागेल.
- देशात असलेल्या भाषांविषयी काय वाटते?
– भाषा ही बोलणाऱयांची संपत्ती आहे. संपत्तीची जपणूक करणे हे भाषिक समाजाचे कर्तव्यच आहे. हिंदुस्थान हे बहुवंशी, बहुसांस्कृतिक, बहुभाषिक राष्ट्र आहे. भाषेच्या दृष्टीने हिंदुस्थान हा एकमेव बहुभाषिक व बहुसांस्कृतिक देश आहे. त्यामुळे सर्व भाषांना या ठिकाणी तेवढेच महत्त्व आहे. संस्कृत ही आर्य भाषेशी निगडित आहे. सामी वंशाची प्रमुख भाषा अरबी, दोन्ही भाषांचे व्याकरण प्रगल्भ आहे. कारण त्यांच्यामध्ये शब्दरचनेची क्षमता आहे. त्यामुळे उत्पत शास्त्र्ााच्या अनुषंगाने भाषेचे मूळ आणि त्यांचा विकासक्रम समजून येतो. लेखनाच्या दृष्टीने भाषा लिपीवर आधारलेली आहे. संस्कृतची लिपी देवनागरी आहे. अरबीची लिपी अरबी आहे. संस्कृत भाषा ही देवनागरीत लिहिली जाते. अरबी भाषा अठरा लेखन शैलीमध्ये लिहिली जाते. जगातील कोणत्याच भाषेला एवढय़ा लिप्या नाहीत. नगर-संभाजीनगर, कर्नाटकातील बिदर या भागातील लोकांची भाषा पाहिली तर ग्रामीण भागात अजूनही काही भागांत दखनीचा प्रभाव हा आहे.
- अनेक ठिकाणी भाषेबद्दल वेगवेगळी मते असतात ?
– वास्तविक पाहता कोणतेच प्रश्न निर्माण होता कामा नयेत. प्रत्येकाला आपापल्या भाषेबद्दल आदर असतो. भाषेबद्दल स्वाभिमान असावा, तो सर्वांनाच असतो. हे करत असताना इतर भाषा हीन समजू नये.
- मातृभाषेतून शिक्षणाबद्दल काय वाटते?
– आपण ज्या प्रांतामध्ये राहतो, त्या प्रांतामध्ये जी भाषा आहे त्या मातृभाषेमध्ये शिक्षण द्यावे. म्हणजे विद्यार्थ्यांना लवकर आकलन होते. आज इंग्रजीकडे अनेक पाल्यांचा कल आहे. इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे. ती आली पाहिजे याबद्दल कुणाचेही मत नाही, पण ती आपण मुलांवर लादतो आणि तिला अनाठायी महत्त्व देतो. मी स्वतः मराठीत शिकलो आणि मराठीबद्दलसुद्धा मला माझ्या मातृभाषेएवढाच अभिमान आहे.
- पुरस्कार मिळालेल्या ग्रंथांविषयी थोडेसे
– राष्ट्रभाषाच नव्हे, तर राष्ट्रभाषेची जननी दखनी भाषा ही माझी मातृबोली आणि मातृभाषा असल्याबद्दल मला तिचा सार्थ अभिमान आहे. माझे गाव व जन्मस्थळ मैंदर्गी, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. मैंदर्गी हे सीमावर्ती गाव महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यांच्या दरम्यान आहे. गावापासून चार किलोमीटर अंतरावर उत्तर कर्नाटकचा कुलबर्गी (पूर्वीचे गुलबर्गा) जिल्हा सुरू होतो. तसेच सोलापूरचे माझे परलोकवासी मित्रवर्य प्रा. फकरुद्दीन बेन्नूर यांनी दिलेले कै. डॉ. श्रीरंग रंगनाथ कुलगर्णी यांचे ‘दखनी भाषा मऱहाटी संस्कृतीचा एक आविष्कार’ या पुस्तकामुळे मला सदरहू संशोधन प्रकल्प निवडण्याची प्रेरणा मिळाली. या प्रेरित होऊन मी झपाटून गेलो. या संशोधन प्रकल्पाच्या लिखाणामध्ये उपरोक्त पुस्तकाचा सविस्तर उपयोग करून घेण्यात आला आहे. पेमराज सारडा महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ.राजेंद्र मारवाडे यांनी पण मला सहकार्य केले.
‘दख्खनची राष्ट्रभाषेकडे वाटचाल व त्यासंदर्भात मराठीचे योगदान’ हा विषय यामध्ये घेण्यात आलेला आहे. मराठीनेच राष्ट्रास दखनीच्या रूपाने राष्ट्रभाषेची देणगी दिली आहे. अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात जे निकष ठरले आहेत, त्या सर्व निकषांची पूर्तता मराठी भाषा करत असून कोणतीच भाषा न देऊ शकलेली अशी अप्रतिम देणगी म्हणजेच राज्य भाषा मराठी व मराठीनेच दिले. संविधानात मराठी भाषेचे स्थान सर्वोच्च ठरते. म्हणून तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला हवा, परंतु यासंदर्भात केंद्र शासनाकडून का होत आहे हे कळू शकत नाही.
उर्दू ही तत्कालीन हैदराबाद संस्थानची राज्य भाषा होती. तेथील सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षण उर्दू माध्यमात चाले, तर आमची मराठी माध्यमात. त्यामुळे आमचे तिकडील नातलग व त्यांच्या मुलाबाळांची भाषा ही अस्खलित उर्दू असे, तर आमची दखनी. आमच्या दखनी संवादामधील न्हाट, भा, पडया, उठया, चल्या, कहया, कर्या, डर्या, मर्या, मार्या, चलतैं, पडतैं, उठतैं, बैठतैं, बी, भी, पन, लई, नको, च, की, ज्वैं, त्वैं, जधाँ, कधाँ, तधाँ, पोट्टा, पोट्टी, भानाँ, बायकाँग, छिनाल, रांडाँ, हमना, तुमना, अपुन, ह्यौ, भौत, बक्कळ, चिक्कळ, रगड, मोप, कसार, टोकरा इत्यादींसारखे आमच्या संवादामधील दखनी शब्द ऐकून आमचे मराठवाडय़ाचे नातलग हसत व ‘‘काय ही तुमची भाषा!’’ असे उपरोधिक टोमणा मारत व आम्ही मनातल्या मनात खजील होऊन जात असू.





























































