दुचाकीस्वाराकडील पावणेआठ लाख लुटले, करंजी घाटातील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संत तुकाराम कारखान्याकडून मिळालेले मुकादमकीचे कमिशन आणि अनामत रक्कम घेऊन निघालेल्या दुचाकीस्वाराला स्कॉर्पिओ गाडी आडवी लावून लुटल्याची घटना पाथर्डी तालुक्यात करंजी घाटात घडली आहे. या घटनेत चोरटय़ांनी सात लाख 70 हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे. याप्रकरणी संतोष शहादेव बडे (रा. भिलवडे, ता. पाथर्डी) यांनी फिर्याद दिली आहे.

संतोष बडे हे मुळशी तालुक्यातील संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याकडे मुकादम आहेत. बडे यांचा भाऊ बबन व त्यांचा मित्र आदिनाथ मिसाळ आणि आदिनाथचा भाऊ सुनील मिसाळ असे चौघे दोन दुचाकींवरून 28 जून 2022 रोजी कारखान्यावर गेले होते. तेथून कमिशनचे सात लाख 70 हजार रुपये घेऊन पाथर्डीकडे येत असताना करंजी घाटात संतोष बडे यांच्या दुचाकीला एका स्कार्पिओ गाडीने अडविले. गाडीतील तिघांनी संतोषला मारहाण करून सात लाख 70 हजार रुपये घेऊन पळ काढला. त्यानंतर आदिनाथ मिसाळ व त्यांचा भाऊ पाठीमागून आल्यानंतर त्यांच्याकडून चावी घेऊन दुचाकी सुरू केल्यानंतर त्यांनी पाथर्डी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

संतोष बडे व त्यांच्या सहकाऱयांवर पाळत ठेवून ही लूट करण्यात आली आहे. लुटीमध्ये संतोष व बबन बडे यांचे पाच लाख 70 हजार रुपये, तर दुसरे मुकादम आदिनाथ मिसाळ यांचे दोन लाख रुपयांची चोरी झाली आहे. ही पाळत नेमकी कोणी, कुठून व कशी ठेवली, याचा तपास पोलीस करीत आहेत. करंजी घाटात लुटीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे पोलीस व नागरिक हैराण झाले आहेत.