सर्कशीच्या तिकीटावरून राडा, पोलिसांना धक्काबुक्की

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्कशीची तिकीट पहिलं कोण घेणार यावरून दोन गटात झालेल्या वादाचे रुपांतर नंतर भयंकर हाणामारीत झाले. या दोन्ही गटातील लोकांनी फक्त एकमेकांनाच नाही तर चक्क पोलिसांना देखील धक्काबुक्की केली. बिजनौर जिल्ह्यातील स्योहारा गावात ही घटना घडली आहे.

स्योहरा गावात गेल्या काही दिवसांपासून सर्कस लागली आहे. दररोज सर्कस पाहण्यासाठी लोकं गर्दी करत आहे. मंगळवारी रात्री देखील 12 वाजता या सर्कशीच्या तिकीटासाठी मोठी गर्दी झाली होती. त्यावेळी तरुणांच्या दोन गटात पहिलं तिकीट काढण्यावरून वाद झाला. त्या वादावरून दोन्ही गटातील तरुण एकमेकांना भिडले. सुरुवातीला हाता पायाने सुरू असलेली मारामारी नंतर सर्कसीच्या खुर्च्या टेबल एकमेकांवर फेकण्यापर्यंत गेली.

दरम्यान काही जणांनी याबाबत पोलिसांना कळवले. काही वेळातच पोलीस घटनास्थळी पोहोचले. मात्र पोलिसही त्यांना सहज रोखू शकले नाही. काही तरुणांनी तर पोलिसांना देखील धक्काबुक्की केली. अखेर पोलिसांच्या बऱ्याच प्रयत्नानंतर ती मारामारी थांबली. या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे.