शिवसैनिकांच्या जीवावर येणार असेल तर आम्ही शांत बसणार नाही – उद्धव ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसैनिकांवर हल्ला झाल्यानंतर स्थानिक आमदारांच्या घरी सुरक्षा पुरवली जाते मात्र हल्ला झालेल्यांना सुरक्षा पुरवली जात नाही. तुम्ही राजकारणात पडू नका. काय राजकारण करायचं ते आम्ही करू मात्र शिवसैनिकांच्या जीवावर येणार असेल तर आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. गुरुवारी रात्री मुंबईतील शिवसेनेच्या भायखळा येथील 2 पदाधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या पदाधिकाऱ्यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दुपारी भायखळा येथे भेट घेतली आणि अत्यंत आपुलकीने चौकशी केली. यावेळी त्याठिकाणी पोलीस देखील उपस्थित होते.

हल्ल्यात जखमी झालेल्या शिवसैनिकांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना रात्री झालेल्या हल्ल्याविषयी माहिती दिली. या शिवसैनिकांची विचारपूस केल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की शिवसैनिकांच्या केसालाही धक्का लागता कामा नये. जर शिवसैनिकांना काही झालं तर जबाबदार तुम्ही असाल. असे उद्धव ठाकरे यांनी खडसावले. आम्ही सुरुवातीपासून शिवसैनिकांना शांततेचं आवाहन करीत आलो आहोत. हे केवळ सुडाचं राजकारण सुरु आहे. ज्यांना तुम्ही संरक्षण दिले आहे, त्यांच्या विरोधात काही सुगावा लागला आहे का? मग त्यांना का संरक्षण दिलं आहे? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी पोलीस अधिकाऱ्यांना विचारला. तुम्ही हल्ला झालेल्या शिवसैनिकांना तातडीने संरक्षण द्या आणि आरोपींचा शोध सुरु करा असे ठाकरे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सांगितले. उद्या काहीही वेडंवाकडं झालं तर तुम्ही जबाबदार असाल असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला. तुमच्याने जर होत नसेल तर तुम्ही हात वर करा मग शिवसैनिक स्वतःचे रक्षण करण्यास समर्थ असतील, असेही त्यांनी बजावले.