
जबरदस्तीने खंडणी उकळणे, खूनाचा प्रयत्न, मारामारी करून शिवाजीनगर भागात दहशत माजविणाऱ्या सराईत श्रीनाथ उर्फ शेरू परदेशी टोळीवर शिवाजीनगर पोलिसांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.
श्रीनाथ उर्फ शेरू परदेशी, रणजित परदेशी, चिराग जोशी, अथर्व देशपांडे (रा, सर्व, शिवाजीनगर), प्रविण शेळके आणि अन्य तिघांवर ही कारवाई करण्यात आली. आरोपी हे बाबा बोडके यांच्या टोळीतील सदस्य आहेत. जे. एम. रस्त्यावरील मोबाईल शॉपीचालकाला शस्त्राचा धाक दाखवून खंडणी मागितल्याप्रकरणी परदेशी टोळीवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींनी मोबाईल शॉपीचालकाकडून 6 लाखांसाठी व्याजासह 35 लाख रुपये उकळले होते.
यासह शेरू परदेशी, रणजित परदेशी, चिराग जोशी यांना जेलमधून सोडविण्यासाठी देशपांडे आणि त्याच्या इतर साथीदारांनी हत्याराचा धाक दाखवून खंडणी मागितली होती. परदेशी टोळीने शिवाजीनगर भागात दहशत माजविली होती. या सर्व पाश्र्वभूमीवर आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाईसाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विक्रम गौड, अंमलदार राहुल होळकर, गणपत वाळकोळी, दिलीप नागरे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावास पश्चिम प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे यांनी मंजूरी दिली. पुढील तपास विश्रामबाग विभागाचे सहायक पोलीस आयुक्त रमाकांत माने करीत आहेत.

























































