
रात्रीच्या वेळी पादचाऱ्याला चाकूचा धाक दाखवून गळ्यातील सोन्याचे बदाम हिसकावून पसार झालेल्या दोघांना स्वारगेट पोलिसांच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, चाकू आणि सोने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मुस्ताफा तन्वीर खान (19, रा. गुलटेकडी), अशिष अभिमान आरणे (23, रा. दोघे. गुलटेकडी) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, त्यांच्या फरार साथीदाराचा शोध सुरू आहे. यातील खान हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. गुरुवारी (दि.14) रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास स्वारगेट परिसरातील गिरीधर भवन चौकाजवळ ही घटना घडली होती. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी हे गुरुवारी रात्री मेडीकलमध्ये जाण्यासाठी घराबाहेर पडले होते. यावेळी खान, आरणे आणि त्यांचा साथीदार दुचाकीवरून फिर्यादी यांच्याजवळ आले. त्यानंतर फिर्यादींना चाकूचा धाक दाखवून गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून पसार झाले होते. दाखल गुन्ह्यात स्वारगेट पोलीस आरोपीचा शोध घेत होते. या दरम्यान सोने हिसकावणारे संशयीत भिमाले उद्यान परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानूसार पथकाने सापळा रचून खान आणि आरणे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्हा केल्याची कबूली दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, चाकू, सोन्याचे बदाम असा 49 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोल येवले यांच्या पथकाने ही कामगिरी केली


























































